कल्याण: अतिवृष्टी मुळे दुकानाच्या झालेल्या नुकसानीचा मोबदला तक्रारदाराला मिळाला. हा मोबदला मिळवून देण्याच्या बदल्यात 15 हजार रूपयांची लाच मागणाऱ्या अनंता कंटे याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दुपारी 1 वाजता तलाठी शहाड कार्यालयात रंगेहाथ अटक केली. कंटे हा या कार्यालयात मदतनीस म्हणून काम करतो.
कंटेला महिला तलाठी अमृता बडगुजर यांनी लाच मागण्यासाठी प्रोत्साहित केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने कंटेसह तलाठी बडगुजर यांच्यावरही महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. बडगुजर यांचा शोधसुरू आहे.
कल्याण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे नुकसान झाले होते. सरकारच्या आदेशाने कल्याण तहसील कार्यालयाने या ठिकाणी पंचनामे केले होते. आपत्तीग्रस्तांना मोबदला देण्यात आला होता. एका व्यक्तीच्या दुकानाच्या गाळ्याचे नुकसान झाले होते. त्याला पंचनाम्यानंतर मोबदला मिळाला. हा मोबदला मिळवून देण्याच्या बदल्यात तलाठी शहाड कार्यालयातील मदतनीस अनंता कंटेने त्या व्यक्तीकडे 15 हजार रुपयांची मागणी केली होती.
विशेष म्हणजे, या पैशाची तडजोड कंटेनेच केली होती. दरम्यान संबंधित व्यक्तीने याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यांनी लावलेल्या सापळ्यात 15 हजाराची रोकड घेताना कंटेला रंगेहाथ अटक केली. पोलीस निरिक्षक पल्लवी ढगे-पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.