कल्याण - दावडी येथील बेकायदा इमारत बांधकाम प्रकरणात अधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याचा आरोप बिल्डरने केला होता. या प्रकरणात अधिकाऱ्यांच्या विरोधात ठोस कारवाई केली जात नसल्याने बिल्डरने लाच लुचपत प्रतिबंध खात्याकडे धाव घेत चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान या प्रकरणात संबंधित बिल्डरची सुनावणी झाली आहे. चौकशी सुरु आहे. ठोस पुरावा बिल्डरने सादर केल्यास दोषींच्या विरोधात कारवाई केली जाईल असे कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.
काही दिवसापूर्वी दावडी परिसरात डीपी रस्त्याच्या आड येणारी सहा मजली बेकायदा इमारत पाडण्याची कारवाई महापालिकेने केली होती. या इमारतीवर कारवाई केली जाणार नाही यासाठी अधिकारी अनंत कदम आणि दीपक शिंदे यांनी बिल्डरकडून पैसे घेतल्याचा आरोप बिल्डर मुन्ना सिंग यांनी केला होता. एका हॉटलमध्ये अधिकाऱ्यांच्यासोबत चर्चेचा सीसीटीव्ही बिल्डरने सादर केला होता. अधिकाऱ्यांनी प्रत्येकी एक लाख रुपये आणि आयुक्तांच्या नावे 25 लाख रुपये घेतल्याचा गंभीर आरोप केल्यावर महापालिका आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली. दोन्ही अधिकाऱ्यांची चौकशी केली. त्याचबरोबर बिल्डरची सुनावणीही घेतली. मात्र संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात प्रशासनाकडून हात आखडता घेतला जात असल्याचा आरोप बिल्डरने करीत लाच लुचपत प्रतिबंध खात्याकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. याच प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंध खात्याकडे मनसेचे आमदार राजू पाटील यांनीही तक्रार करीत चौकशीची मागणी केली होती.
या प्रकरणी आयुक्त सूर्यवंशी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, या प्रकरणात चौकशी सुरु आहे. 17 सप्टेंबर रोजी समितीचा अहवाल सादर केला जाणार आहे. बिल्डरने केलेल्या आरोपानुसार त्याच्याकडे असलेले ठोस पुरावे त्याने समितीला सादर करावे. बिल्डरची पहिली सुनावणी झाली आहे. दुसऱ्या सुनावणीसाठी त्याला कळविले आहे. ठोस पुरावा सादर केल्यास तथ्य आढळून आल्यास दोषींच्या विरोधात कारवाई केली जाईल असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. बिल्डर कारवाई टाळण्यासाठी असे आरोप करीत असतात. मात्र महापालिकेने गेल्या दीड वर्षात 62क् बेकायदा इमारती जमीन दोस्त करण्याची कारवाई केली आहे. ही कारवाई यापूढेही अशीच सुरु राहणार असल्याचा इशारा बेकायदा बांधकामधारकांना दिला आहे.