कल्याण-कल्याण शीळ रस्त्यालगत असलेल्या नेकणीपाडा बस स्टॉपच्या मागे असलेल्या पाच एकर जागेत बिल्डर घुसखोरी करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही जागा शेतकरी वासूदेव पाटील यांची आहे. या जागेत बिल्डरने घुसखाेरी केल्यास भूमीपूत्र त्या विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा भूमीपूत्रांनी दिला आहे.
आजदे याठिकाणी राहणारे वासूदेव पाटील यांची नेकणी पाडा बस स्टॉपच्या मागच्या बाजूला पाच एकर जागा आहे. पाटील यांच्या या जागेवर वडिलोपार्जीत कब्जे वहिवाट आहे. या जागेत काल सायंकाळी सात वाजता बिल्डरने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्याने त्याच्या साेबत खाजगी बा’डीगार्ड आणले होते. या वेळी त्याठिकाणी पोलिसही पाेहचले होते. या प्रकरणी खाजगी बिल्डरच्या घुसखोरीला पोलिसांचे पाठबळ असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.पाटील यांनी सांगितले की, ही जागा आमच्या कब्जे वहिवाटीत आहेत. अशा प्रकारे परप्रांतीय बिल्डर आमच्या जागेत कशी काय घुसखोरी करु शकतो. त्याने आमच्या जागेत घुसखोरी करुन आम्हाला हुसकाविण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न आम्ही हाणून पाडला आहे. मात्र त्यांच्याकडून अशा प्रकारचा प्रयत्न पुन्हा केला जाऊ शकतो.
या भागातील भूमिपूत्र आणि सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील यांनी सांगितले की, वासूदेव पाटील यांच्या जागेत बिल्डरने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही गटात वाद होऊ नये म्हऊन पोलिस आले होते. वासूदेव पाटील आणि बिल्डर या दोघांच्या बाजू एकून घेतल्या पाहिजेत. जागेचा प्रश्न हा महसूल विभागाशी संबंधित असल्याने पोलिसांनी वासूदेव पाटील आणि बिल्डरला महसूसी अथवा दिवाणी न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला पाहिजे. बिल्डरने दडपशाही करण्याचा प्रयत्न केल्या. या प्रकरणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला पोलिस जबाबदार असतील. हा प्रश्न सूटला नाही भूमीपूत्र आंदोलन करतील. या प्रश्नी खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार राजू पाटील यांच्याकडेही दाद मागितली जाणार आहे.
वासूदेव यांच्या पत्नी वंदना पाटील यांनी सांगितले की, परप्रांतीय बिल्डरची आमच्या जागेत केली जाणारी घुसखोरी आम्ही खपवून घेणार नाही. त्या विरोधात आंदोलन करणार. भूमीपूत्रांनी घुसखोरी करणाऱ्या बिल्डरच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिल्यावर पोलिस आत्ता काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.