- मयुरी चव्हाण
कल्याण - अनधिकृत बांधकाम, त्यामागील अर्थकारण आणि लाच या सर्व वादग्रस्त विषयांमुळे कल्याणडोंबिवली शहर नेहमीच चर्चेत असते. आता "बेकायदा" बांधकाम करणाऱ्या एका बिल्डरनेच अनधिकृत इमारतीवर कारवाई न करण्यासाठी पालिकेच्या अधिका-यांनी लाखो रुपये उकळले असल्याचा आरोप केला आहे. या आरोपामुळे पुन्हा अधिकारी आणि बिल्डरांच साटलोट उघड झालं असल्याचं बोललं जातं आहे. अधिका-यांवर कारवाई होत नसल्याचं सांगत संबंधित बिल्डरने चक्क ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र लाच घेणं हा जसा गुन्हा आहे तसेच लाच देणं हा सुद्धा गुन्हाच असल्यानं बेकायदा बांधकाम करून नागरिकांची फसवणुक करणा-या बिल्डरांवर देखील कारवाई झाली पाहिजे अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. (Building a house in Kalyan Dombivali is "dangerous", unauthorized builders continue to deceive citizens)
सध्या कल्याण डोंबिवली शहरातील अनधिकृत बांधकाम पालिकेच्या रडारवर असून प्रभागनिहाय अनधिकृत बांधकामांची यादी देखील तयार करण्यात आली आहे.त्यामुळे भूमाफियांचे धाबे देखील दणाणले आहेत. पालिकेचे अधिकारी दीपक शिंदे आणि अनंत कदम यांची एका बिल्डरसोबत झालेली बैठक सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून समोर आली असल्याने अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. अधिका-यांनी लाखो रुपये उकळले असल्याचा आरोप खुद्द बिल्डरनेच केला आहे. या सर्व प्रकाराची खमंग चर्चा सध्या पालिका वर्तुळात सुरू आहे. दोन्ही अधिकारी तसेच संबंधित बिल्डरची सुद्धा चौकशी सुरू आहे. तसेच तिघांच्याही कॉल रेकॉर्डची तपासणी करण्यात येणार आहे. सीसीटीव्ही फुटेज मध्ये चित्रण असले तरी संभाषण नाही असं केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी सांगितले.
केडीएमसीमध्ये अनधिकृत बांधकाम प्रकरणी कर्मचा-यांपासून ते अगदी पालिकेचे "बिग बॉस" म्हणून ओळखले जाणा-या अधिका-यांना "अतिरिक्त" मार्गाने लक्ष्मीदर्शनाचा लाभ घेणं महागात पडलं आहे. इतकंच नाही तर वारंवार लाचखोरी करूनही काही "स्मार्ट" अधिकारी आपली "वजनदार" खुर्ची टिकवून आहेत. मात्र या भल्यामोठ्या "सोनसाखळीत" फसवणूक होऊन नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होऊन ते रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे बेकायदा इमारत पूर्ण झाल्यावर कारवाई करण्यापेक्षा वेळेत कारवाई करावी अशी रास्त अपेक्षा सामान्य नागरिक व्यक्त करत आहे. बेकायदा बांधकाम करायचं, लाच द्यायची पुन्हा आरोप करायचे त्यामुळे या सर्व प्रकरणामागे नेमकं काय शिजतयं? याचीही चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
" अनधिकृत बिल्डरवर आधी गुन्हा दाखल करा" लाच घेणं जसा गुन्हा आहे तर लाच घेणं हा देखील गुन्हा आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकाम करणा-या बिल्डरांवर देखील आधी गुन्हे दाखल झाले पाहिजे असे रोखठोक मत आरटीआय कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी व्यक्त केले आहे. तसेच अधिकारी पैसे मागत असतील तर आधीच तक्रार करणे अपेक्षित आहे. पैसे देऊन त्यानंतर तक्रार करणे शंकास्पद आहे. विशेष बाब म्हणजे अनधिकृत बिल्डरच आता लाच देऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे जात आहेत ही बाबच आश्चर्यकारक आहे.
अनधिकृत बांधकाम उभी राहण्याअगोदरच योग्य तो बंदोबस्त झाला पाहिजे ..म्हणजे बिल्डरला व त्याच्या ग्राहकांना झालेल्या आर्थिक नुकसानीतून अशा प्रकारचे आरोप होत नाही. सूडभावनेतून झालेल्या आरोपांपोटी अधिका-यांचे खच्चीकरण होता कामा नये. - संतोष डावखर , अधिकृत विकासक..
बिल्डरनं दिलं स्पष्टीकरण मी चूक केली त्याची मला शिक्षा मिळाली. अजून काही शिक्षा मिळाली मला तरीही चालेल.पालिकेच्या चौकशीवर माझा विश्वास नाही. अस असतं तर एव्हाना दोन्ही अधिका-यांना निलंबीत केलं गेलं असत अस बिल्डर मुन्ना सिंग यांनी स्पष्ट केलं आहे.माझा एसीबीवर विश्वास आहे म्हणून मी त्यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे. अधिका-यांनी पैसे घेऊन देखील कारवाई केली. उत्तर भारतीयांना टार्गेट केलं जातं आहे. माझं केडीएमसी प्रशासनाला आव्हान आहे की कल्याण डोंबिवलीत अजूनही अनधिकृत बांधकामे सुरू आहेत त्याच्यावरही कारवाई केली गेली पाहिजे.पण ती का होत नाही? असा सवाल देखील सिंग यांनी उपस्थित केला आहे.