डोंबिवली: घरफोडीच्या गुन्हयातील एका अट्टल चोरटयास रामनगर पोलिसांनी सापळा लावून अटक केली आहे. त्याच्याकडून घरफोडीच्या गुन्हयातला १ लाख १० हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आकाश सोनू केदारे ( वय १९) रा. आयरेगाव,डोंबिवली पूर्व असे अटक आरोपीचे नाव आहे.
२३ नोव्हेंबरला आयरेगावातील एका उघडया दरवाजावाटे आत प्रवेश करून चोरटयाने घरातील सोन्याचे दागिने, मोबाईल असा १ लाख २० हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक योगेश सानप यांचे पथक करीत होते.
सानप यांच्या पथकातील पोलिस हवालदार विशाल वाघ, प्रशांत सरनाईक, पोलिस नाईक दिलीप कोती, देवीदास पोटे, नितीन सांगळे यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, घरफोडीच्या गुन्हयातील आरोपी आकाश हा आयरेगाव , ज्योतीनगर येथे आला आहे. ही माहीती मिळताच सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कुराडे आणि वरीष्ठ पोलिस निरिक्षक नितीन गिते, महिला पोलिस निरिक्षक (गुन्हे) आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक सानप यांचे पथक घटनास्थळी आरोपीला पकडण्यासाठी रवाना झाले.
पोलिसांची चाहुल लागताच आरोपी आकाशने पळ काढला. दरम्यान पोलिसांनी लावलेल्या सापळयात पळणा-या आकाशला पाठलाग करीत जेरबंद केले गेले. त्याने गुन्हयाची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहीती सानप यांनी दिली.