डोंबिवली : भाजीविक्रीच्या निमित्ताने इगतपुरीहून कल्याण-डोंबिवलीत येऊन टेहळणी करून घरफोड्या करणाऱ्या बबन जाधव (रा. गोंदेदुमाला, इगतपुरी, जिल्हा नाशिक) या सराईत चोरट्यास मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या चाैकशीत चार गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याला बारमध्ये पैसे उधळण्याचाही नाद होता, असे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले. आडिवली ढोकळी परिसरातील गीतांजली अपार्टमेंटमध्ये चोरट्याने घरफोडी करून घरामधील सोन्याचे दागिने व रोकड, असा एकूण चार लाख ५४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. त्यावेळी हा चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता.
मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनंत लांब, हवालदार दामू पाटील, विजय कोळी, मधुकर घोडसरे, संदीप बर्वे, महेंद्र मंझा, प्रवीण किनरे, संतोष वायकर यांच्या पथकाने कसोशीने केलेल्या तपासात चोरी करणाऱ्या जाधव याला इगतपुरी येथून अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने चार ठिकाणी घरफोडी केल्याचे उघड झाले आहे. त्याच्याकडून गुन्ह्यातील १५ तोळे सोन्याचे दागिने असा सहा लाख ७५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
जाधव इगतपुरी आणि घाेटी येथील शेतकऱ्यांकडून भाजी घेऊन विक्रीसाठी कल्याण-डोंबिवलीत यायचा. तीन-चार दिवस या ठिकाणी मुक्काम करून तो बंद घरांची टेहळणी करायचा आणि मध्यरात्रीच्या सुमारास कटावणीद्वारे कुलूप तोडून घरफोडी करत असत, असे पोलिसांनी सांगितले.