कल्याण: ए.टी.एम कार्डाची अदला-बदली करून लोकांच्या बँक खात्यातील रोकड लांबविणा-या सराईत गुन्हेगारास कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. हरेश उर्फ आकाश अर्फ दैत्या राहुल प्रधान ( वय २४ ) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याचे दोन साथीदार फरार आहेत.
महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्हयाचा समांतर तपास कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाकडून सुरू होता. पोलिस हवालदार प्रशांत वानखेडे यांना संबंधित गुन्हयातील तीन आरोपींपैकी एकजण कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी भागात येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस हवालदार वानखेडे, सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष उगलमुगले, पोलिस कॉन्स्टेबल रविंद्र लांडगे, मिथुन राठोड, विनोद चन्ने , विजेंद्र नवसारे आदींच्या पथकाने चक्कीनाका परिसरात सापळा लावला आणि आरोपी हरेशला अटक केली. हरेश कडून महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यासह बदलापूर पोलिस ठाणे, अंबरनाथ येथील शिवाजीनगर आणि मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तालयातील पेल्हार पोलिस ठाण्यातील फसवणूकीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. याआधी निजामपुरा, मुंब्रा, भिवंडी, कोळसेवाडी, उल्हासनगर-मध्यवर्ती, बदलापुर आदि पोलिस ठाण्यांमध्येही एकुण आठ गुन्हे दाखल असल्याची माहीती वरीष्ठ पोलिस निरीक्षक नरेश पवार यांनी दिली.
एटीएम केंद्रात आलेेल्या पण एटीएम कार्ड वापरण्याचे फारसे ज्ञान नसलेल्या व्यक्ती हरेश आणि त्याचे साथीदार हेरायचे आणि त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम कार्डची अदलाबदल करून त्यांच्या बॅक खात्यातील रोकड काढून पसार व्हायचे. तिघा भामटयांचे चेहरे एटीएममधील सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाले होते. त्याच्यावरून हरेशला पकडण्यात गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आले.