डोंबिवली: दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसातही मध्य रेल्वेची वाहतूक सुरू होती, त्यामुळे सोमवारी सकाळपासून प्रवाशांना दिलासा मिळाला होता. तेवढ्यात सकाळी ८ वाजेदरम्यान कल्याण स्थानकात सिग्नल फेल झाल्याने लोकल वाहतुकीचा बोजा उडाला. त्यामुळे पावसात चालली पण सिग्नलमध्ये अडकली अशी स्थिती लोकल प्रवाशांची झाली.
पाऊण तास लोकल नसल्याने काहींनी कोपर, ठाकुर्ली स्थानक रेल्वे रुळातून चालून गाठले आणि त्याचा फटका कामावर जाणाऱ्या प्रवाशांना बसला. प्रवाशांचे सगळया नियोजनावर सपशेल पाणी फिरवले गेले. सकाळपासून दहा मिनिटे विलंबाने सुरू असलेली लोकल सिग्नल गोंधळामुळे विस्कळीत झाली. जलद, धीम्या सर्व मार्गावरील वाहतूकीवर त्याचा परिणाम झाला. मध्य रेल्वे याबाबत उद्घोषणा यंत्राद्वारे माहिती देत नसल्याने नेमका गोंधळ कुठे आणि काय झाला होता याची माहिती प्रवाशांना मिळू शकली नाही. त्यामुळे प्रवाशाना अडचणीला सामोरे जावे लागले.
कल्याण मध्ये बिघाड झाल्याने त्या स्थानकासह डोंबिवली, दिवा, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, टिटवाळा मार्गावर आदी सर्वत्र प्रवाशांची तोबा गर्दी झाल्याने सगळा गोंधळ उडाला होता. त्यात लांबपल्याच्या गाड्यांची देखील वाहतूक विस्कळीत झाल्याने त्या गाड्यांनी ठिकठिकाणी जाणारे प्रवासी ठाणे, कल्याण स्थानकात अडकले होते.
एरव्ही सकाळी ९ वाजेदरम्यान डोंबिवली स्थानकात कल्याण सीएसएमटी ही एसी जलद लोकल या सिग्नल।गोंधळामुळे तासभर लेट आल्याने त्या गाडीने जाणाऱ्या शेकडो महिलांचे हाल झाले. स्थानकात उभे रहायला जागा नव्हती, एवढी प्रचंड गर्दी झाल्याने आबालवृद्ध प्रवाशांचे हाल झाले.
सकाळच्या सत्रात ही घटना घडल्याने प्रवासी हैराण झाले होते, काय करावे कोणाला सुचले नाही. काहींनी घरी परत जाण्याचा मार्ग स्वीकारला, आठवड्याच्या शुभारंभाला दांडी होण्याचे त्यांना दडपण होते. त्यामुळे रेल्वेच्या भोंगळ कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त झाली.