प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: एकीकडे सोनसाखळी, मोबाईल आणि दुचाकी चोरीच्या घटना घडत असताना दुसरीकडे या गुन्हयातील अट्टल चोरटयाला मानपाडा पोलिसांच्या पथकाने शहाड रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली आहे. मुस्तफा उर्फ मुस्सु जाफर सैय्यद उर्फ इराणी ( वय २४) रा. आंबिवली, कल्याण असे चोरटयाचे नाव असून त्याच्या चौकशीत १३ गुन्हयांची उकल करण्यात आली आहे. त्याच्या साथीदाराचा शोध सुरू असल्याची माहीती डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे यांनी दिली.
३ जूनला सकाळी सात वाजण्याच्या सुमारास भोपर कमानी जवळ शरद कडुकर या पादचा-याकडील मोबाईल चोरटयाने लंपास केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. दरम्यान सोनसाखळी, दुचाकी आणि मोबाईल चोरीच्या घडणा-या घटना पाहता पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये या गुन्हयांच्या तपासकामी विशेष पथके नेमण्यात आली आहेत. पोलिस निरीक्षक सुरेश मदने , सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश वनवे, सुनिल तारमळे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भानुदास काटकर, पोलिस हवालदार राजेंद्र खिल्लारे, शिरीष पाटील, सुनिल पवार, संजु मासाळ, विकास माळी, पोलिस नाईक यल्लापा पाटील, देवा पवार, पोलिस शिपाई अशोक आहेर, विजय आव्हाड, महेंद्र मंझा यांचे पथकाकडून मोबाईल चोरीच्या गुन्हयाचा तपास सुरू होता.
दऱम्यान गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहीतीनुसार पथकाने शहाड रेल्वे स्थानक परिसराबाहेर सापळा लावून आरोपी मुस्तफा इराणीला ताब्यात घेण्यात आले. मानपाडा, कळवा, शिवाजीनगर, मध्यवर्ती, नारपोली, कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मुस्तफाने त्याच्या साथीदारासह सोनसाखळी, मोबाईल, दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली चौकशीत दिली. त्याच्याकडून ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, आठ दुचाकी, पाच मोबाईल असा ४ लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.मुस्तफावर २१ गुन्हे दाखल
मुस्तफाच्या चौकशीत सोनसाखळी, मोबाईल आणि दुचाकीचोरीचे एकुण १३ गुन्हे उघडकीस आले आहेत. दरम्यान त्याच्याविरोधात महात्मा फुले चौक, कोळसेवाडी, खडकपाडा, मानपाडा आणि रामनगर पोलिस ठाण्यात याआधी २१ गुन्हे दाखल असल्याची माहीती सहाय्यक पोलिस आयुक्त कुराडे यांनी दिली.