कल्याण: शिकवणीसाठी जाणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला रस्त्यात थांबवून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवून त्याच्याकडील ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी एका भामट्याने लांबवल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टिटवाळा येथे राहणारा विराज दलाल (१७) हा शनिवारी सकाळी ९.३० च्या सुमारास शिकवणीसाठी पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातून जात होता. यावेळी, काळा तलाव कोठे आहे असे एका भामट्याने विराजला विचारत, त्याठिकाणी एका मुलीचे एका मुलासोबत भांडण झाले असून, तो मुलगा तुझ्यासारखा दिसतो अशी बतावणी केली. मी काहीच केले नसून मी आता शिकवणीला जात असल्याचे विराजने त्या भामट्याला सांगितले. त्यावेळी, भामट्याने विराजला बोलण्यात गुंतवून लालचौकीच्या दिशेने घेऊन गेला.
याठिकाणी एका फर्निचरच्या दुकानासमोर आल्यावर विराजला गळ्यातील सोनसाखळी बॅगेत ठेवायला सांगितले. भामट्याच्या सांगण्यानुसार विराजने सोनसाखळी असलेली बॅग दुकानासमोर ठेवली. थोडे पुढे गेल्यानंतर विराजला तिथेच थांबण्यास सांगून भामटा मागे फिरला. बराच वेळ होऊनही भामटा परत न आल्याने दुकानासमोर ठेवलेली बॅग घेण्यासाठी गेलेल्या विराजला तेथे बॅग आढळून आली नाही. याप्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विराजने बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.