मयुरी चव्हाण
डोंबिवली - जेव्हा मराठी अस्मितेचा मुद्दा येतो तेव्हा सांस्कृतिक नगरी डोंबिवली शहराचं नावदेखील आवर्जून पुढे येते. आजच्या आधुनिक युगातही आपलं मराठमोळपण या शहरान टिकवून ठेवलंय. मराठी सण उत्सव, साजरे करताना आजची पिढीही मोठया आनंदान सहभागी होते. मात्र, शालेय जीवनातच मराठी सण, त्यांचं महत्व, ते का साजरे केले जातात, त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन व इतर बारकावे आपल्या डोंबिवलीतील आजीबाईंनी अगदी तंतोतंत बाप्पाच्या आरासमधून मांडले आहेत.
पश्चिमेकडील गणेशनगर परिसरातील गौरू आपार्टमनेट राहणाऱ्या वानखेडे कुटुंबियांच्या बाप्पाची आरास गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत. निलिनी वानखेडे यांच्या मनात एक अनोखी संकल्पना आली. मग काय, सूनबाईंचीही त्याला मोलाची साथ लाभली, अन घरातली इतर मंडळीही आरास बनवण्याच्या कामाला लागली. तब्बल सहा महिन्यांपासून सासू सुनेच्या जोडीनं यासाठी तयारी केली. घरातल्या वस्तूंचा कल्पतेने वापर करत ही आरास साकारण्यात आली आहे. नलिनी वानखेडे सांगतात की, ही संकल्पना साकारण्याच कारणं अस की, नुसते सण उत्सव साजरे केले जातात पण त्याची पार्श्वभूमीवर व इतर बारकावे आजच्या पिढीला माहिती नाही. काही मोजकेच सण मुलांना माहिती आहेत. त्यामुळे देखाव्याच्या माध्यमातून प्रत्येक मराठी महिन्यातील सण चित्र, मूर्ती , विविध वस्तूंच्या माध्यमातून कल्पकतेचा वापर करून मांडण्यात आल्या आहेत.
सून स्वाती वानखेडे यांनी या आरास मांडण्यास मेहनत घेतली असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. तर, गणेशभक्त आवर्जून आपल्या मुलांना घेऊन देखावा बघायला येत आहे. ही आरास पाहून लोकांना खूप आनंद होत आहे अशी भावना एकनाथ वानखेडे यांनी व्यक्त केली. काही मोजके सण आम्हाला माहीत होते. पण जेव्हा आरास बनवायला आम्ही आजीला मदत करत होतो, तेव्हा आम्हाला मराठी कॅलेंडर, कोणत्या मराठी महिन्यात कोणता सण येतात याची सर्व माहिती मिळाली. आमची मित्रमंडळी सुद्धा देखावा बघायला येत आहेत अशा प्रतिक्रिया घरातली चिमुकली मंडळी मानस, ओजस आणि अर्थव यांनी व्यक्त केल्या आहेत.