उल्हासनगर : सिंधी समाजाच्या चालिया उत्सवाची सांगता मंगळवारी होणार असून सिंधी बांधवानी चालिया मंदिरात एकच गर्दी केली. मंदिर तलावात मटकी फोडून उपवास सोडण्यात येणार असून शिवसेना शिंदे गटाच्यावतीने मंदिरा पर्यंत जाण्यासाठी मोफत बस सेवा दिली आहे. श्रावण महिन्या प्रमाणे सिंधी समाजात चालिया उत्सव मोठ्या जल्लोषात पाळला जातो. सिंधी बांधव चाळीस दिवस उपासाचे व्रत पळून केस कापण्यास वर्ज्य करतात.
कॅम्प नं-५ येथील चालिया मंदिरात चाळीस दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करून देश-विदेशातील लाखो सिंधी बांधव दर्शन करण्यासाठी मंदिरात येतात. मंगळवारी चालिया पर्वाची सांगता असून सिंधी बांधव मंदिर शेजारील तलावात पूजाअर्चा करून मटकी फोडतात. यावेळी मंदिरात हजारोंच्या गर्दी उसळत असल्याने, कडक पोलीस बंदोबस्त ठेवून मुख्य रस्त्यावरील वाहतूक इतर रस्त्याने वळविली आहे. कॅम्प नं-५ येथील चालिया मंदिरात जाता यावे म्हणून कॅम्प नं-१ येथील बस स्टॉप पासून शिवसेना शिंदे गटाच्यां वतीने मोफत बस सेवा सुरू केली आहे. शेकडो नागरिक या बस सेवेचा फायदा घेत असल्याची माहिती महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरुण आशान, दिलीप गायकवाड, शहरप्रमुख राजेंद्र (भुल्लर )महाराज, रमेश चव्हाण, के.डी तिवारी, तिरुपती रेड्डी, नाना बागुल, कलवंत सिंग सोहता, अंकुश म्हसके, बाळा श्रीखंडे, जितू उपाध्ये, विजय सुपाळे, ज्ञानेश्वर मरसाळे, विनोद सालेकर, आदेश पाटील, बाजीराव लहाने, राजू लहाने, तुषार बांदल, सर्व शाखाप्रमुख शिवसैनिक व युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.