उल्हासनगर : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर शनिवारी उल्हासनगर दौरा असून टॉउन हॉलमध्ये उल्हासनगर, कल्याण पूर्व व अंबरनाथ विधानसभा क्षेत्रातील ३ हजार बूथ वारियर्ससोबत ते संवाद साधणार आहेत. त्यानंतर घर चलो अभियान अंतर्गत बावनकुळे नागरिकासोबत संवाद साधून सभा घेणार असल्याची माहिती शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी दिली आहे.
कल्याण लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारी बाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा शनिवारी उल्हासनगर दौरा आहे. दुपारी ४ ते साडे पाच वाजण्याच्या दरम्यान ते टॉउन हॉल मध्ये कल्याण लोकसभा क्षेत्रातील उल्हासनगर, कल्याण पूर्व व अंबरनाथ विधानसभेतील ३ हजार बूथ वारीयर्स सोबत संवाद साधणार आहे. त्यानंतर ६ वाजता कॅम्प नं-१ येथील जुना बस स्टॉप, भाजी मार्केट परिसरात घर चलो अभियान अंतर्गत नागरिकांसोबत संवाद साधणार आहेत. यावेळीं स्थानिक आमदार व पक्षाच्या कामाबाबत नागरिकांना प्रश्न विचारणार आहेत. यावेळी त्यांची सभाही आयोजित केली आहे.
कॅम्प नं-१, येथील जुना बस स्टॉप परिसरातील सभेनंतर पुन्हा टॉउन हॉल मध्ये येऊन लोकसभा कोअर समिती पदाधिकाऱ्या सोबत प्रदेशाध्यक्ष संवाद साधून ते कल्याण लोकसभा बाबत मते विचारात घेणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष येणार असल्याने, भाजपा पदाधिकारी कामाला लागल्याचे चित्र शहरात आहे. शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार कुमार आयलानी, माजी अध्यक्ष जमनुदास पुरस्वानी आदींची उपस्थिती होती.
प्रदेशाध्यक्षानंतर केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांच्या दौरानरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कल्याण लोकसभेतून एनडीएचा उमेदवार निवडून येण्यासाठी भाजप पूर्वतयारी करीत असल्याची माहिती शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी माहिती दिली आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या दौऱ्यानंतर पुन्हा केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर येणार असल्याची संकेत रामचंदानी यांनी दिले.