कल्याण: मंगळवारपासून गणेशोत्सवाला सुरूवात होत आहे परंतू लागलीच बुधवारी दिड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे. दिड दिवसाबरोबरच पाच दिवस, सात दिवस, नऊ दिवस, तसेच अनंत चतुर्दशीला होणा-या गणेश विसर्जनाच्या दिवशी मिरवणूक मार्गावर वाहतूककोंडी होऊ नये, वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी वाहतुकीत बदल केले गेले आहेत. नो पार्किंग झोनसह पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याबरोबरच अवजड वाहनांना देखील गणेश विसर्जनाच्या दिवशी प्रवेश बंदी केली गेली आहे.
दुर्गाडी चौक याठिकाणी गणेशघाट आहे. त्यामुळे गणेश विसर्जनाच्या दिवशी याठिकाणी मोठी गर्दी असते या पार्श्वभूमीवर आधारवाडी सर्कल ते दुर्गामात चौक, सहजानंद चौक ते दुर्गामाता चौक आणि दुर्गामाता चौक ते उर्दु स्कुल हा संपूर्ण रोड सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नो पार्किंग झोन केला गेला आहे. पर्यायी मार्ग म्हणून कोनगावकडून दुर्गाडीमार्गे कल्याण शहराच्या दिशेने येणारी वाहने ही आधारवाडी चौकातून (दुर्गाडी चौक व परिसरातील मार्गावर गणेशमुर्ती विसर्जन मिरवणुकीमुळे रहदारीची कोंडी झाल्यास) इच्छीत स्थळी जातील.
कोळशेवाडीकडून कोनगावच्या दिशेने जाणारी वाहने ही गोविंदवाडी बायपास नाक्यावरून डावे वळण घेवून गोविंदवाडी मार्गाने इच्छीत स्थळी जातील. तर कोनगाव येथून डोंबिवली मानपाडा कल्याण शिळफाटा च्या दिशेने जाणारी वाहने ही दुर्गाडी पुलाकडून रोडच्या विरूध्द दिशेच्या लेनवरून दुर्गाडी-गोविंदवाडी बायपास मार्गाने इच्छीत स्थळी जातील. दुर्गामाता चौक ते लालचौकी नाका दरम्यानचा मार्ग हा नो पार्किंग झोन करण्यात आला आहे. जर कोनगाव गणेशघाट व दुर्गाडी गणेशघाट येथील गणेश विसर्जन मिरवणुकांमुळे रहदारीची कोंडी झाल्यास या मार्गाची वाहतूक पर्यायी म्हणून कल्याण शहरातून गांधारी पूल मार्गे येवई नाक्याकडे व कल्याणकडे येण्यासाठी येवई नाक्यावरून गांधारी पूल मार्गे वाहन मार्गक्रमण करतील असे वाहतूक शाखेने जाहीर केलेल्या अधिसूचनेत म्हंटले आहे.
विसर्जनाच्या दिवशी जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदी
विसर्जनाच्या दिवशी जड-अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. शहरात येणा-या सर्व प्रकारच्या सार्वजनिक बसेस यांना देखील दुर्गाडी, लालचौकी, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे प्रवेश बंद केला आहे. या बसेस गोविंदवाडी बायपास पत्रीपूल, वल्लीपीर चौक, गुरूदेव हॉटेल मार्गे कल्याण रेल्वे स्थानक व एसटी आगार येथे जातील व त्याच मार्गे इच्छीत स्थळी जातील. तर मुरबाड रोडने येणा-या बसेस यांना प्रेम ऑटो सर्कल येथे बंदी केली आहे. या बसेस बिर्ला कॉलेज रोड, दुर्गाडी, गोविंदवाडी बायपास, पत्रीपुल, वल्लीपीर चौक गुरूदेव हॉटेल मार्गे कल्याण रेल्वे स्थानक आणि एसटी डेपो येथे जातील आणि त्याच मार्गे इच्छीत स्थळी जातील.
मुख्य मिरवणुकीच्या मार्गावर नो पार्किंगमुरबाड रोड, महात्मा फुले चौक, महमद अली चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शंकरराव चौक, घेला देवजी चौक, दुधनाका, पारनाका, टिळकचौक, अहिल्याबाई चौक, गणपती चौक, तेलवणे हॉस्पिटल चौक, मोहिंदर सिंग काबुल क्रॉस रोड, लालचौकी, दुर्गामाता चौक ते दुर्गाडी गणेशघाट हा विसर्जन मिरवणुकीचा मुुख्य मार्ग आहे. या मुख्य मार्गास येवून मिळणा-या जोड रस्त्यांवर १०० मीटरपर्यंत सर्व प्रकारची वाहने उभी करण्यास मनाई आहे.