उल्हासनगर : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत वालावलकर मैदान घोडबंदर ठाणे येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला जाण्यासाठी महापालिकेने १२० बसेसचे नियोजन केले. सभेच्या ठिकाणी ५ हजार महिला नेण्याचे टार्गेट महापालिकेवर असून त्यांच्या चहा-पाणी, नाष्टा व जेवणाची व्यवस्था महापालिका करणार आहे.
उल्हासनगर महापालिकेने मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत अंगणवाडी सेविका व मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेच्या ५ हजार लाभार्थी महिलाना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा स्थळी नेण्यासाठी १२० बसेसचे नियोजन केले होते. महापालिका प्रभाग अधिकारी व मुख्य अंगणवाडी सेविका यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली.
लाडक्या बहिनेच्या लाभार्थी महिलांना शहरातील विविध ठिकाणी बोलावून तेथून बसेसद्वारे ठाणे येथे सभेस्थळी त्यांनी नेले. शनिवारी सकाळी ९ वाजता अंगणवाडी सेविका व लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना बोलाविण्यात आले होते. मात्र बसेस २ ते ३ तास उशिराने आल्याने, त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या चहा-पाणी, दोन वेळा नाष्टा व जेवणाची व्यवस्था महापालिकेने केली.
महापालिकेने मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत शहरातील अंगणवाडी सेविका व मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेतील लाभार्थीना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभास्थळी नेण्यासाठी १२० बसेसची व्यवस्था केली. त्यांना जेवण, नाश्ता व चहा-पाणी देण्यात येणार आहे. जिल्हातील सर्वच महापालिकेने असे नियोजन केले. - विकास ढाकणे (आयुक्त-उल्हासनगर महापालिका)