कल्याण-डोंबिवलीनजीक असलेल्या पलावा गृहसंकुलातील नागरिकांना मालमत्ता करात ६६ टक्के सवलत देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात घेतलेल्या बैठकी दरम्यान घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे २६ हजार सदनिकाधारकांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांची दिवाळी गोड झाली आहे.कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे ह्यांच्या पुढाकाराने ही बैठक बोलविण्यात आली होती.
या बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, युवासेना सचिव दीपेश म्हात्रे, कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील, भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सुर्यवंशी, भाजपा कल्याण लोकसभा प्रमुख शशिकांत कांबळे, बंडू पाटील, माजी नगरसेवक रवी म्हात्रे, पंढरी पाटील, सतरपाल सिंग,अनिल म्हात्रे एमआयडीसी प्राधिकरण आयुक्त डॉ. विपिन शर्मा, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांडगे यांच्यासमवेत संबंधित प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
पलावा हा एकात्मिक नगर वसाहत प्रकल्प असल्याने त्याचा कोणताही भार महापालिका प्रशासनावर येत नसतानाही येथील रहिवाशांकडून संपूर्ण कराची आकारणी केली जात होती. येथील सदनिकाधारकांच्या मालमत्ता करात ६६ टक्के सूट देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकी दरम्यान २७ गावांच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न तातडीने आणि कायमस्वरुपी सोडविण्यासाठी सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. २७ गावातील नागरिकांना एमआयडीसीच्या माध्यमातून अधिक दाबाने मुबलक पाणी उपलब्ध करून देणे, अधिकचे बूस्टर पंप बसविणे, नळजोडण्यांचा व्यास दुप्पट करणे यांसारख्या उपाययोजना राबविण्यात याव्या असे सूचित केले आहे.
पाणी वितरण व्यवस्था उभारण्यासाठी सविस्तर नियोजन आराखडा तयार करत त्यांची तातडीने त्यांची अंमलबजावणी करण्यात यावी.पिंपळेश्वर महादेव मंदिर परिसराचा ऐतिहासिक ठेवा जपणे महत्वाचे असल्याने सध्या मंदिर परिसराची सुमारे ६ एकर जागा एमआयडीसी प्राधिकरणाच्या नावे आहे. ही जागा मंदिर देवस्थानाच्या नावे करण्यात यावी अशी स्थानिकांची मागणी आहे. याबाबत आज सकारात्मक चर्चा घडून आली असून जागा लवकरच हस्तांतर करण्यात येईल असे आश्वासन यावेळी दिले.