मुरलीधर भवार-कल्याणः कल्याण-तीन मुले शाळेत गेली होती. मात्र ती शाळेजवळून गायब झाली. त्या मुलांचा शोध लागत नसल्याने हवालदील झालेल्या मुलांच्या वडीलांनी महात्मा फुले पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने तीनही मुलांचा शोध लावला आहे. मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे. ही मुले खडवली नदीवर अंधोळीसाठी गेली होती. मात्र पोलिस वेळीच त्याठिकाणी पोहचल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
विजय तोंबर हे कल्याण पश्चिमेच्या रामबागेत राहतात. त्यांची एक मुलगी आणि दोन मुले ही जोशीबागेतील शाळेत शिकतात. सकाळी ही तिन्ही मुले शाळेत गेली हेाती. या तिन्ही मुलांना शाळेच्या गेटवर शिक्षकांनी पाहिले होते. मात्र ही मुळे शाळेत जाता त्याठिकाणी परतली. ती मुले शाळेतून घरी न आल्याने ती मुले कुठे गेली. याचा शोध मुलांच्या वडिलांनी सुरु केला. मुलींचा काही पत्ता लागत नसल्याने हवालदिल झालेल्या मुलांच्या वडिलांनी महात्मा फुले पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करुन घेतली.
तीन मुले हरविली असल्याने पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाने आणि पोलिस निरिक्षक प्रदीप पाटील यांच्या पथकाने मुलांचा तातडीने तपास सुरु केला. मुले राहत असलेली वस्ती, शाळा या परिसरासह कल्याण स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही तपासले. ही मुले कल्याण स्टेशनमधील सीसीटीव्हीत दिसून आली. ही मुले कल्याण स्टेशनहून आसनगावच्या दिशेने ट्रेनने गेल्याचे दिसून आले. ही मुले ट्रेनने खडवली स्थानकात गेली. त्या स्थानकातून त्यांनी खडवली नदी गाठली.
ही मुले खडवली नदीवर अंघोळीकरीता केली होती. मुले नदीत अंघोळीला उतरण्याच्या बेतात होती. मात्र वेळीच त्याठिकाणी पोलिस पोहचले. पोलिसांनी त्या मुलांना घेऊन कल्याण गाठले. मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे. तेव्हा कुठे पालकांच्या जीवात जीव आला. पालकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.