कल्याण नजीक असलेल्या मोहने, आंबिवली, बल्याणी, जेतवननगर परिसरातील रस्त्यांची खड्डय़ांमुळे चाळण झालेली आाहे. रस्त्यावरील खड्डे भरले जात नसल्याने संतप्त नागरीकांसह शिवसैनिकांनी आज अ प्रभाग कार्यालय गाठले. रस्त्यावरील खड्डे बुजविले गेले नाही तर केडीएमसी कार्यालयास टाळे ठोकू असा इशारा संतप्त नागरीकांसह शिवसैनिकांनी प्रशासनास दिला आहे.
महापालिका हद्दीतील रस्त्यांची देखभाल दुरुस्ती आणि रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिले होते. आयुक्तांच्या आश्वासनापशचात ही खड्डे बुजविले जात नसल्याने आयुक्तांनी थेट रस्त्यावर उतरून खड्डे बुजविण्याच्या कामाची पाहणी केली. तसेच रस्त्यावरील खड्डे वेळेत बुजविले गेले नाहीत तर ठेकेदारांनी काळ्य़ा यादीत टाकण्यात येईल अशी तंबी आयुक्तांनी दिली होती. त्याचबरोबर अधिका:यांनी २४ तासात ऑन फिल्ड राहण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. महापालिकेने खड्डे बुजविण्याचे काम सुरु केले आहे. शहरातील बहुतांश ठिकाणी खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत.
मोहने , आंबिवली, जेतवननगर, वडवली, बल्याणी भागातील रस्त्यावरील खड्डे बुजविले गेलेले नाहीत. संतप्त नागरीकांसह शिवसैनिकांनी अ प्रभाग कार्यालय गाठले. प्रभाग अधिकारी सुहास गुप्ते यांना खड्डे कधी बुजविणार असा जाब विचारला. यावेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक विजय काटकर, दशरथ तरे, दया शेट्टी आदी सहभागी झाले होते. रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवा अन्यथा महापालिका मुख्यालयासह प्रभाग कार्यालयास टाळे ठोकू असा इशारा दिला. महापालिका उपायुक्त धैर्यशील जाधव यानी खड्डे बुजविण्याचे आश्वासन दिले आहे.