कल्याण : पावसाळयाच्या तोंडावर लहान आणि मध्यम गटारांच्या सफाईची कामे केडीएमसीकडून सुरू आहेत. परंतू गटारीतून काढला जाणारा गाळ आणि कचरा हा तत्काळ उचलला जात नसून दुर्गंधीबरोबरच मनपाकडून रोगराईला देखील आमंत्रण दिले जात आहे का? असा सवाल वास्तव पाहता उपस्थित होत आहे. वेळेवर उचलला जात नसल्याने सध्या पडणा-या अवकाळी पावसाच्या वाहत्या पाण्यात हा गाळ आणि कचरा पुन्हा गटारात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कल्याण पश्चिमेकडील भागात ठिकठिकाणी गटार सफाईची कामे सुरू आहेत. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महमदअली चौक दरम्यानच्या रस्त्याच्या लगतच्या गटारांची देखील सहा दिवसांपुर्वी साफ सफाई केली. गटारांमधील गाळ आणि कचरा काढला परंतू तो मंगळवारी देखील उचलला गेला नव्हता. याचा त्रास रस्त्यावरून जाणा-या पादचा-यांबरोबरच इथल्या व्यापारी वर्गाला सहन करावा लागत आहे. पाच ते सहा दिवसांपासून कचरा जैसे थे पडून राहिल्याने दुर्गंधीबरोबरच रोगराई पसरण्याची शक्यता आहे.
इथल्या व्यापारी वर्गाने केडीएमसीचे अधिका-यांना वारंवार फोन करून तसेच व्हॉटसअॅपच्या माध्यमातून रस्त्यावरील गाळ आणि कच-याचे फोटो पाठवून तक्रार देखील केली आहे. परंतू अधिका-यांकडून कामगार पाठवतो, उचलतो अशीच उत्तर व्यापा-यांना दिली जात आहेत पण प्रत्यक्षात मात्र कचरा ठिकठिकाणी जैसे थे च पडून आहे. एकिकडे स्वच्छता राखा, कचरा रस्त्यावर टाकू नका, रोगराईला आमंत्रण देऊ नका असे आवाहन केडीएमसीकडून वारंवार नागरिकांना केले जाते. परंतू वास्तव पाहता महापालिकेला स्वत:च्याच आवाहनाचा विसर पडला आहे का? असे म्हणणे उचित ठरेल.
तक्रारीची दखल नाहीगटार सफाईची कामे झाली ही समाधानाची बाब असलीतरी गटारातून काढलेला कचरा आणि गाळ सहा दिवसानंतरही रस्त्याच्या लगत पडून आहे. महापालिकेच्या अधिका-यांच्या ही बाब तक्रार तसेच व्हॉटसअॅपच्या माध्यमातून फोटो पाठवून निदर्शनास आणुन दिली परंतू तक्रारीची दखल घेतली गेलेली नाही. मनपा रोगराई पसरण्याची वाट पाहत आहे का? तातडीने कचरा उचलला जावा अशी आम्हा व्यापा-यांची मागणी आहे - हरीश खंडेलवाल, अध्यक्ष, कल्याण महानगर व्यापारी फेडरेशन