कल्याण-आजच्या आषाढी एकादशीनिमित्त सेंच्युरी रेयॉन, बी.के. बिर्ला कॉलेज, बी.के. बिर्ला नाईट कॉलेज, बी.के. बिर्ला पब्लिक स्कूल आणि सेंच्युरी रेयॉनच्या संयुक्त विद्यमाने ज्ञान दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये निसर्ग संवर्धन- स्वच्छतेच्या प्रबोधनासोबतच श्री विठोवा- रुक्मिणीच्या भक्तीभावाचे दर्शन झाले. बिर्ला कॉलेजच्या प्रांगणातून सुरू झालेली ही ज्ञान दिंडी प्रेम ऑटो, शहाड पुलामार्गे शहाड येथील विठ्ठल मंदिरापर्यंत काढण्यात आली.
यावेळी अतिरिक्त पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे, भाजप आमदार गणपत गायकवाड, माजी आमदार नरेंद्र पवार, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, आमदार कुमार आयलानी, महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ओ.आर. चितलांगे, उपाध्यक्ष सुबोध दवे, संचालक डॉ.नरेश चंद्र, प्राचार्य डॉ.अविनाश पाटील, सेंच्युरी रेयॉनचे युनिट हेड दिग्विजय पांडे आदी मान्यवर सहभागी झाले होते.या ज्ञानदिंडीतील रथावर विराजमान विठ्ठल आणि रुक्मिणीसह सजवलेल्या पालख्या, ढोल पथक, लेझीम पथक, एम पॉवर आणि योग पथकांचीही लक्षणीय उपस्थिती होती. हजारो भाविकांची भजन मंडळी वारकरी कीर्तनाच्या तालावर नाचत पुढे सरकत होती. तसेच या दिंडीत कल्याण परिसरातील शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्थांव्यतिरिक्त हजारो स्थानिक वारकरी भाविकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.