प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार केडीएमसीतर्फे दुर्गाडी किल्ल्यासह इतर ५० ठिकाणी ‘स्वच्छता मोहीम’ राबविण्यात आली. यात मनपा अधिकारी, कर्मचा-यांसह लोकप्रतिनिधी, एनजीओंसह एनएसएस, एनसीसीच्या शालेय विदयार्थ्यांनी सहभाग घेत सकाळी १० ते ११ यावेळेत श्रमदान करीत सफाई मोहीम राबविली.
केडीएमसीच्या वतीने कल्याण पश्चिमेकडील दुर्गाडी किल्ल्याच्या ठिकाणी राबविलेल्या मोहीमेत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील सहभागी झाले होते. स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत श्रमदान करताना कल्याण हे सर्वात स्वच्छ शहर असावं, म्हणून सर्वांनी योगदान देण्याची आवश्यकता आहे असे पाटील म्हणाले. या अभियानाच्यावेळी महापालिका अधिकारी, कर्मचारी, माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, एचिर्व्हेस कॉलेज, बिर्ला पब्लिक स्कुलचे विदयार्थी, नाना धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, सामाजिक संस्था व स्थानिक नागरिका सहभागी झाले होते. दुर्गाडी किल्ला परिसर स्वच्छ केल्यामुळे त्याला आगळीवेगळी झळाळी प्राप्त झाली होती.
दुर्गाडी किल्ल्याप्रमाणेच मनपा क्षेत्रातील पर्यटन, धार्मिक, बाजारपेठ, रेल्वे स्थानक, शाळा, कॉलेजसह इतर अशा ५० ठिकाणी ही मोहीम राबविली गेली. कल्याण पूर्व परिसरात आमदार गणपत गायकवाड यांनी तर डोंबिवली पुर्वेतील उर्सेकरवाडी, डॉ राथ रोड या परिसरात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला होता. यात मनपा अधिकारी कर्मचा-यांसह मनपाचे माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक, विविध सामाजिक संघटना, एनएसएस आणि एनसीसीचे विदयार्थी देखील सहभागी झाले होते.