लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : पर्यावरणाने समृद्ध असलेली डोंबिवलीजवळील उंबार्ली टेकडी पोखरून तेथे ‘म्हाडा’तर्फे केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेतून घरकुले बांधण्यात येत आहेत. निसर्गाला हानी पोहोचवून काँक्रिटचे जंगल उभारण्यात काय अर्थ आहे? त्यामुळे या प्रकल्पाला स्थगिती द्यावी, अशी मागणी मनसेने करीत ५ जानेवारीला तेथे आंदोलनाची हाक दिली आहे.
मनसेचे राजेश कदम म्हणाले, उंबार्ली टेकडीवर वनविभाग, भूमिपूत्र, पक्षी व निसर्गप्रेमींनी ४० हजार वृक्षांची लागवड केली आहे. या टेकडीवर नागरिक फिरायला येतात. वनप्रेमी तेथे झाडांना पाणी घालतात. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी काही दिवसांपूर्वी या टेकडीवरील वनराईचे जतन करण्याबरोबर तेथे नाशिकच्या धर्तीवर बॉटीनिकल गार्डन उभारण्याचा मानस व्यक्त केला होता
.मात्र, या टेकडीनजीक ‘म्हाडा’तर्फे पंतप्रधान आवास योजनेतील घरे बांधण्यात येणार आहेत. टेकडी त्यासाठी पोखरली जात आहे. या प्रकल्पास स्थगिती द्यावी, अशी मनसेची मागणी आहे.
युती सरकारच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी डोंगर-टेकड्या पोखरून दगड-माती काढू नये, असे आदेश दिले होते. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे या कामाकडे दुर्लक्ष होत आहे. उंबार्ली टेकडी वाचविण्यासाठी आरेच्या धर्तीवर मनसे आंदोलन करणार असल्याचे कदम म्हणाले.