भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा सण असलेल्या गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्षारंभानिमित्ताने सर्वत्र चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण आहे. राज्यभरात आज विविध ठिकाणी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील विविध ठिकाणी जाऊन कार्यक्रमात सहभागी होत आहे.
डोंबिवली नगरीची ओळख असलेल्या रौप्य महोत्सवी नववर्ष स्वागत यात्रेत एकनाथ शिंदे यांनी सहभागी होऊन उपस्थित नागरिकांना शुभेच्छा देत संवाद साधला. हिंदू नववर्षानिमित्त स्वागत यात्रा काढण्याची संकल्पना डोंबिवली शहरापासून सुरू झाली. गेली २५ वर्षे हा उपक्रम अविरतपणे सुरू राहणे हे कौतुकास्पद आणि अभिमानास्पद असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच शहरातील गणेश मंदिराला १०० वर्षे पूर्ण झाल्याने लवकरच या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार असून इथे नक्कीच सुंदर गणेश मंदिर उभारले जाईल, असं आश्वासन देखील यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिले.
सदर कार्यक्रमात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि स्थानिक मनसेचे आमदार राजू पाटील देखील उपस्थित होते. सदर कार्यक्रम झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील मनसेच्या शाखेला देखील भेट दिली. यावेळी राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार करत स्वागत केले. सदर भेटीबाबत माहिती देताना राजू पाटील म्हणाले की, मी एकनाथ शिंदे यांना विनंती केली, साहेब...ऑफिस बाजूलाच आहे, तुम्ही येता का?, यावर एकनाथ शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न लावता हो चालेल, असं म्हणत होकार दिला, अशी माहिती राजू पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
दरम्यान, आपल्याला जे काही बोलायचे आहे ते आपण २२ मार्च रोजी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्क वरून बोलू, असे सांगत राज ठाकरे यांनी एका नव्या चर्चेला सुरुवात करून दिली आहे. दरवर्षी दसऱ्याला उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होतो. गुढीपाडव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज ठाकरे यांची जाहीर सभा त्याच शिवाजी पार्कवर होते. गुडीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे कोणत्या दिशेने गुढी उभारणार? हा राज्यातील राजकीय नेते, कार्यकर्ते यांना पडलेला प्रश्न आहे.
शिंदे-फडणवीस-राज यांच्या भेटीगाठी वाढल्या-
गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या वाढलेल्या भेटीगाठी आणि राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेली तयारी, त्यांची पुढची दिशा स्पष्ट करणारी आहे. मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला महापालिका निवडणूक सोपी नाही. कारण अनेक आमदार अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र निवडणूक लढवणार असे दिसत आहे. हे पहाता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उमेदवारांचा पराभव करण्यासाठी राज ठाकरे यांना भाजपाकडून पडद्याआड सपोर्ट केला जाईल, असं सांगण्यात येत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम