मुरलीधर भवार, कल्याण: सीएनजी गॅस पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस कंपनीकडून देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे तीन दिवस सीएनजी गॅस पंप बंद राहणार आहे. ही माहिती कळताच कल्याणमधील सीएनजी गॅसवर चालणाऱ्या रिक्षा चालकांनी गॅस भरण्यासाठी काल रात्रीपासून पंपावर रांगा लावल्या आहेत.
कल्याणमध्ये सीएनजी गॅस इंधनावर चालणाऱ्या रिक्षांची संख्या जवळपास ९० टक्के आहे. त्याचबराेबर सहा आसनी टॅक्सी आणि अन्य सीएनजीवर चालणारी चार चाकी वाहनेही आहेत.
सीएनजी गॅस पंप बंद राहणार असल्याचे कळताच काल रात्रीपासून कल्याणमधील सीएनजी गॅस पंपावर रिक्षा चालाकंनी गॅस भसण्याकरीता रांगा लावल्या होत्या. रिक्षा चालक राजेश टाक यांनी सांगितले की, रिक्षा चालकांना याची पूर्व कल्पना दिलेली नाही. त्यामुळे ऐनवेळी गॅस कुठे आणि कसा भरायचा यामुळे रिक्षा चालकाची चांगलीच तारांबळ उडाली. काही रिक्षा चालकांनी रांग लावली होती. मात्र १२ वाजता पंप बंद झाला. सकाळी सुरु झाल्यावर नंबरयेईल अशा आशेवर काही रिक्षा चालक पहाटेपर्यंत पंपावर रांगेत होते. एका रिक्षात साडे तीन ते चार किलो सीएनजी गॅस भरला जातो. हा गॅस एका दिवसापूरताच पुरतो. त्यानंतर पुन्हा रात्री गॅस भरावा लागतो. गॅस मिळाला नाही तर रिक्षा बंद ठेवावी लागेल. काही रिक्षा चालकांनी सांगितले की, कोन गाव आणि मुरबाड परिसरात ऑफलाइन सीएनजी गॅस उपलब्ध करुन दिला जात असल्याने त्याठिकाणी रिक्षा चालकांनी आज पुन्हा एकच गर्दी केली. त्याही ठिकाणी २ ते ३ तास रिक्षा चालकांना रांगेत उभे राहावे लागले.