कल्याण / अंबरनाथ : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. स्थानिक पातळीवर तेथील परिस्थिती लक्षात घेऊन नगरपंचायतीमध्ये काही ठिकाणी आघाडी झाली होती. आताही महापालिका निवडणुकीत आघाडी करण्यास काही हरकत नाही, असे सूतोवाच नगरविकास व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी आघाडीचे संकेत दिल्याने आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीच्या आघाडीचे संकेत मिळत आहेत. मात्र, काँग्रेसची भूमिका काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.श्री मलंगगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष महेश गायकवाड यांनी शनिवारी मलंगगड परिसरात क्रिकेट सामने भरवले होते. यावेळी शिंदे उपस्थित होते. ते म्हणाले, शहरात मोठ्या प्रमाणावर क्रिकेट सामने भरवले जातात. मात्र, ग्रामीण भागातही चांगले क्रिकेटपटू असून, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रथमच मोठ्या प्रमाणात भरवलेल्या क्रिकेट स्पर्धेत मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू गेले पाहिजेत, अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली.या क्रिकेट सामन्यात ४० वर्षे वयोगटांतील खेळाडूंचे ४८ संघ सहभागी झाले आहेत, तर ४० पेक्षा जास्त वय असलेल्या खेळाडूंचे १० क्रिकेट संघ सहभागी झाले आहेत. अंतिम सामना जिंकणाऱ्या संघाला एक लाखाचे पारितोषिक दिले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
पालिका निवडणुकांत आघाडीस हरकत नाही; पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे सूतोवाच
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 12:55 PM