मुंबई - कल्याण-डोंबिवलीवरून ठाणे आणि मुंबईपर्यंत जाताना वाहतूककोंडीमुळे प्रवासी अक्षरश: मेटाकुटीला येतात. अनेक भागांत कासवगतीने वाहतूक पुढे सरकते. मात्र, आता हा प्रवास जलद आणि वाहतूककोंडीमुक्त होणार आहे. कल्याण-डोंबिवलीवरून मुंबईत सुसाट जाता येणार आहे. कारण, एमएमआरडीएमार्फत माणकोली ते मोठागावदरम्यान उल्हासखाडीवर पुलाचे बांधकाम करण्यात येत असून, आजच्या घडीला या प्रकल्पाचे एकूण काम ८४ टक्के झाल्याचा दावा प्राधिकरणाने केला आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी मंगळवारी या प्रकल्पाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान आयुक्तांनी या प्रकल्पाचे काम आणखी वेगाने करण्याच्या सूचना दिल्या. प्रकल्प वेळेत आणि वेगाने पूर्ण व्हावा, यासाठी सुरक्षितरीत्या प्रकल्पाचे काम पूर्ण करावे, असे देखील आयुक्त यावेळी म्हणाले.
डोंबिवली ते ठाणे वेळ वाचणारप्रकल्प पूर्ण झाल्यानंतर डोंबिवलीवरून ठाणेदरम्यान वाहतुकीच्या वेळेत बचत होणार आहे. या रस्त्यामुळे मुंब्रा, शिळफाटा, कळंबोली आणि पनवेल या क्षेत्रांत प्रवेश न करता प्रस्तावित कल्याण रिंग रोड आणि कटाईनाकावरून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ वरून खोपोली मार्गे वाहतूक वळेल. ज्यामुळे डोंबिवली ते ठाणे या रस्त्याने प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होईल. सर्वसामान्यांना रेल्वेशिवाय वाहतुकीचे अतिरिक्त पर्याय उपलब्ध होतील.