कल्याण- सह्याद्रीच्या फूटहिल्स समजला जाणारा चढाईकरीता अतिशय कठीण असलेल्या श्रीमलंग गडाची चढाई कल्याणच्या लहानग्यांनी केली आहे. त्यांनी हा गड सर केल्याने सर्वत्र त्यांचे कौतूक होत आहे.
अवघ्या चार वर्षाची श्राव्या भोसले, साक्षी हिप्परकर, आठ वर्षाची सृजन धर्माधिकारी, दहा वर्षाचा ईशान पासवन आणि नंदिनी थोपटे यांनी हा गड सर केला आहे. त्यांच्या या कामगिरीने कल्याणचे नाव महाराष्ट्रात उंचावले आहे. या लहानग्यांनी सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर या गिर्यारोहक संघाच्या मार्फत श्रीमलंग गडावर यशस्वी चढाई केली. सह्याद्री रॉक ऍडव्हेंचरचे दर्शन देशमुख, रणजित भोसले, पवन घुगे, भूषण पवार, सुनील खणसे, संजय कारे, प्रशिल अंबादे, अभिषेक गोरे,आणि सुहास जाधव ह्यांनी लहानग्यांना चढाईकरीता तांत्रिक सहकार्य आणि मानसिक पाठबळ देऊन ही मोहीम यशस्वी करून दाखवली.
श्रीमलंगडाचा माथा गाठण्यासाठी सुमारे दोन तासांची चढाई करावी लागते. भितीवर मात करण्याची मानसिक तयारी हवी. गडाचा माथा गाठण्याकरीता अगदी एकच पाय ठेवता येईल अशी जागा आहे. पाईपवरुन वाट आहे. चढाई करताना पाय निसटला तर हजारो फूट दरीत कोसळून मृत्यू होऊ शकतो.
श्रीमलंग गड म्हणजे माथेरान डोंगर रांगेत उभा असलेला सुमारे ३ हजार २०० फूट उंच असलेला टेहळणी कडा आहे. शिलाहार राजाने निर्माण केलेला हा तत्कालीन कालखंडात फक्त आजूबाजूच्या परिसरावर लक्ष देण्यासाठी बनवला गेला होता. कल्याणच्या दक्षिणेपासून अवघ्या सोळा किलोमीटर अंतरावर हा गड आहे. पनवेल-वावंजे गावापासून हा किल्ला दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे. बदलापूरच्या नैऋत्येस व मुंबई आणि साष्टीच्या पूर्वेस हा किल्ला आहे. करंजा, उरणच्या नैऋत्येस आणि बोरघाट, भीमाशंकर व माळशेज घाट पूर्वेस असा हा भाग एकेकाळी लढाईच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा किल्ला होता.