लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाचा २०२२-२३ वर्षाचा १,७७३ कोटी ५६ लाख रुपये जमेचा, तर १,७७२ कोटी ५० लाख रुपये खर्चाचा अर्थसंकल्प शुक्रवारी आयुक्त तथा प्रशासक डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सादर केला. तसेच त्यांनी त्यांच्या अधिकारात त्याला तत्काळ मंजुरीही दिली. विशेष म्हणजे, या अर्थसंकल्पात नागरिकांवर कोणतीही कर दरवाढ लादलेली नाही. मात्र, येत्या वर्षातही आरोग्य सेवा बळकट करण्यावर भर दिला जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
आरोग्यासाठी ४३ कोटींची तरतूद केली आहे. कल्याण पश्चिमेला १००, तर डोंबिवलीत ५० खाटांचे प्रसूतीगृह सुरू केले जाणार आहे. टिटवाळा येथे सामान्य रुग्णालय, तर कल्याणमध्ये मल्टी स्पेशालिटी रुग्णालय सुरू केले जाईल. शास्त्रीनगर व रुक्मिणीबाई रुग्णालयात १० आयसीयू, नवजात बालकांसाठी १० खाटांचे एनआयसीयू सुरू करण्यात येईल.
अल्प दरात सोनोग्राफी
एमआयआर, सीटीस्कॅन, सोनोग्राफी, पॅथोलॉजी लॅब तयार केली जाणार आहे. कॅथ लॅब आणि रेडिओलॉजी युनिट पीपीपी तत्त्वावर सुरू करून अल्प दरात आरोग्य सेवा दिली जाईल.
६८ ठिकाणी हेल्थ वेलनेस सेंटर
आरोग्य सेवेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीने ६८ ठिकाणी हेल्थ वेलनेस सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. दहा ठिकाणी पॉलिक्लिनिक्स उभारली जातील.
नवीन नागरी आरोग्य केंद्रे
सुनीलनगर, चोळेगाव, तिसगाव, विजयनगर, कचोरे, मोहने आणि वायलेनगर येथे नवीन नागरी आरोग्य केंद्रे सुरू केली जातील. एक डायलिसिस सेंटर सुरू झाले आहे. दोन ठिकाणी सुरू केले जातील.
सरकारकडून निधी आलाच नाही
आयुक्तांनी मागील वर्षी मालमत्ताकराच्या वसुलीवर जास्त भर दिला होता. त्यामुळे मनपाची विक्रमी वसुली झाली होती. कोरोनामुळे त्यांनी विकासकामांना कात्री लावली होती. मनपास मिळालेल्या उत्पन्नातूनच त्यांनी कोरोनाचा खर्च भागविला. सरकारकडे मागितलेला २१४ कोटींचा निधी मनपास प्राप्त झालेला नाही.