डाेंबिवली : पश्चिमेतील काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक नंदू म्हात्रे यांच्या प्रभागात महात्मा फुले रस्त्याचे काँक्रिटीकरण चार महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, या कामात २५ वर्षांपूर्वीच्या जीर्ण झालेल्या ड्रेनेज वाहिन्या अडथळा ठरत आहेत. त्यामुळे काँक्रिटीकरणाचे काम कासवगतीने सुरू आहे.
म्हात्रे यांच्या मागणीनुसार महात्मा फुले रस्त्याचे ४०० मीटरचे काँक्रिटीकरण करण्यासाठी तत्कालीन राज्यमंत्री व आमदार रवींद्र चव्हाण यांनी एमएमआरडीएकडून चार कोटींचा निधी मंजूर करून घेतला. सप्टेंबरमध्ये या रस्त्याचे काम सुरू झाले. मात्र, खोदकामानंतर २५ वर्षे जुन्या जीर्ण झालेल्या ड्रेनेज वाहिन्यांचेही काम करावे लागणार असल्याचे केडीएमसीच्या निदर्शनास आले. त्यानुसार तीन महिने ते काम करण्यात आले. आता ते अंतिम टप्प्यात असल्याचे केडीएमसीच्या अभियंत्यांनी सांगितले.
मात्र, काँक्रिटीकरणास विलंब होत असल्याने नागरिक व वाहनचालकांना महात्मा फुले रस्त्यावर कोल्हापुरे चौकातून पुढे पाण्याच्या टाकीकडे जाताना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. ही बाब म्हात्रे यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच चव्हाण यांनीही कामाला गती द्यावी, अशा सूचना केली आहे. रिक्षाचालक मालक युनियनचे उपाध्यक्ष शेखर जोशी यांनी रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला कामाला गती द्या, अन्यथा त्या मार्गावर रिक्षा बंद करू, असा इशारा दिला आहे. या कामात पाण्याच्या वाहिन्या तुटल्यानेही काही रहिवाशांना त्रास होत आहे. त्याकडे लक्ष द्यावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
‘कामाला गती मिळेल’महात्मा फुले रस्त्यावर काम सुरू असताना ड्रेनेज वाहिन्या जीर्ण झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांचे काम करण्यात वेळ गेला. आता काम पूर्ण होत आले असून, लवकरच त्या कामाला गती मिळेल, असे केडीएमसीच्या कनिष्ठ अभियंत्यांनी सांगितले.