मुरलीधर भवार -कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत महापालिकेने जंबो कोविड सेंटर कोरोनाच्या पहिला लाटेवेळीच उभारली होती. महापालिका हद्दीत महापालिकेची सात कोविड केअर आणि रुग्णालये आहेत. त्यापैकी सगळ्यात मोठे कोविड केअर सेंटर हे ‘टाटा आमंत्रा’ आहे. त्याठिकाणी पहिल्या लाटेच्या वेळेपासून कोरोना रुग्णांची संख्या हजारोंच्या घरात आहे. येथील रुग्णांना दिवसभरात नाश्ता, जेवण पुरवणाऱ्या खासगी कंपनीच्या २४५ कामगारांना स्वत:च्या जेवणाकरिता पुरेसा वेळ मिळत नाही. अनेकजण रुग्णांचे पोट भरल्यावर वेळ मिळेल तसे जेवण करतात.
दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढली. टाटा आमंत्रा येथे दाेन हजार २०० रुग्ण उपचार घेत आहेत. टाटा आमंत्रा या इमारतीच्या तळघरातच मेगा किचनची व्यवस्था आहे. दररोज दोन हजारपेक्षा जास्त रुग्णांना महापालिकेकडून दोनवेळचे मोफत जेवण, एकवेळचा नाश्ता आणि दोनवेळचा चहा दिला जातो. या मेगा किचनचे काम महापालिकेने नितीन राम यांच्या किचन कंपनीला दिले आहे. त्यांच्यामार्फत रुग्णांना जेवणाचा पुरवठा केला जातो. पहाटे चार वाजल्यापासून कामाची सुरुवात हाेते. जेवण तयार करून ते पॅकिंग करून रुग्णांच्या रूममध्ये आणून दिले जाते. दुपारचे जेवण १२ च्या दरम्यान दिले जाते. पुन्हा दुपारी २ वाजल्यापासून रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू हाेते. रुग्णांना ७.३० ते ८ वाजतादरम्यान जेवण दिले जाते. या गडबडीत कामगारांना स्वत:च्या जेवणासाठी वेळही मिळत नाही.
मी व माझा मुलगा टाटा आमंत्रा येथे उपचार घेत आहोत. जेवण खूप छान दिले जात आहे. त्याविषयी कुठली तक्रार नाही. स्टाफ खूप समंजस आहे. माझा मुलगा लहान असल्याने त्याला दूध दिले जात होते.- जान्हवी असलेकर
मी व माझी मुलगी सात दिवसांपेक्षाही जास्त काळ टाटा आमंत्रा येथे उपचार घेत हाेताे. तेथील जेवण आणि नाश्ता उत्तम होता. चांगले व्यवस्थापन होते. अधिकारी स्वत: येऊन चौकशी करून जात होते.- मनोज प्रधान
मी भिवंडीहून गावी निघालो होतो. माझी रेल्वे स्थानकावर चाचणी पॉझिटिव्ह आली. तेव्हा मला टाटा आमंत्रा येथे दाखल केले. मला टाटा आमंत्रा येथील खानपान व्यवस्थेत कुठेही त्रुटी आढळून आल्या नाहीत.- अशरफ मारुफ
काय दिले जाते जेवणात?- चपाती, डाळ, भात, भाजी दुपारी आणि रात्रीच्या वेळच्या जेवणात- सकाळी नाश्ता दिला जातो. त्यात उपमा, कांदा-पोहे, इडली-चटणी, मेदुवडा-सांबर दिले जाते.- सकाळी आणि सायंकाळी दोनवेळा चहा दिला जातो.- लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांना दूध दिले जाते.
टाटा आमंत्रा आणि डोंबिवली क्रीडा संकुलातील रुग्णांना जेवण पुरविले जात आहे. दोन हजारपेक्षा जास्त रुग्णांना दोनवेळचे जेवण आणि नाश्ता दिला जातो. जवळपास २४५ कामगारांचे हात या दोन्ही ठिकाणी राबतात. वेळेवर जेवण, नाश्ता दिला जातो.- नितीन राम, पुरवठादार
रुग्णांची जेवण आणि नाश्ता याविषयी विशेष काळजी घेतली जाते. महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना मोफत जेवण दिले जाते. रुग्ण कोणत्याहीवेळी दाखल झाला, तरी त्याला जेवण उपलब्ध करून दिले जाते.- संजय जाधव, सचिव, केडीएमसी