लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ : अनधिकृत बांधकामांवरील कारवाई असो की नियमांत बसणारे काम... अंबरनाथ पालिकेत चकरा मारून अनेकांच्या चपला झिजल्या. पण अधिकारी- कर्मचारी दाद द्यायला तयार नाहीत. फुटकळ कारवाई केल्यासारखे दाखवून नामानिराळे होणाऱ्यांची संख्याच अधिक. खेटे घालून घालून चपला झिजत असल्याने काँग्रेसने नागरिकांसाठी लोखंडी चपला तयार केल्या असून पालिकेबाहेरच त्याचा स्टॉल लावण्याची तयारी केली आहे. अधिकाऱ्यांची कमतरता असून, एकाच अधिकाऱ्याकडे दोन ते तीन खात्यांची जबाबदारी आहे. कर्मचाऱ्यांचीही संख्या अपुरी आहे, उत्तर कामासाठी येणाऱ्यांना दिले जाते. त्यामुळे नागरिकांना वारंवार चकरा माराव्या लागतात. त्यावरून नागरिकांचे पालिका कर्मचाऱ्यांसोबत वादविवाद होतात. खटके उडतात. पण त्यावर तोडगा निघत नाही. याचा निषेध म्हणून काँग्रेसने चक्क लोखंडाच्या चपला तयार केल्या आहेत.
पालिकेत फेऱ्या मारून चपला झिजू नयेत, म्हणून नागरिकांना लोखंडाच्या चपला देण्याची तयारी सुरू आहे.
अंबरनाथमध्ये फुटकळ कारवाई उलनचाळ परिसरातील तीन मजली बांधकामाची तक्रार करूनही त्यावर पालिकेने फुटकळ कारवाई केल्याचे दाखवले. त्यामुळे माजी नगरसेवक मिलिंद पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पालिका प्रशासन संबंधित व्यक्तीवर कोणताही गुन्हा दाखल करण्यासाठी पुढाकार घेत नाही, असा आक्षेप आहे.