कल्याण- कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणूका जशा जवळ येऊ लागल्या आहेत. तशा अनेक राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. एकीकडे डोंबिवलीत मनसेच्या मध्यवर्ती शहर शाखेच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावत डोंबिवलीच्या भाजाप आमदारांनी शुभेच्छा दिल्या. यामुळे मनसे भाजपाच्या युती बाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. तर दुसरीकडे नवनिर्वाचित केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होतोय. पाटील यांच्या नेतृत्वात ठाणे जिल्ह्यात जन आशीर्वाद यात्रा सोमवारी काढली जाणार आहे. प्रथमच आगरी समाजाला केंद्रात मंत्री पद मिळाल्याने भाजपामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
ठिकठिकाणी बॅनरबाजी सुद्धा करण्यात आली आहे. मात्र कल्याण शीळ रोडवरील एका बॅनरने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण शिवसेनेचे माजी आमदार आणि त्यांच्या पुत्राकडून कपिल पाटील यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मागील विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी डावलली गेल्यानं नाराज असलेले शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोइर हे येणा-या काळात हातात कमळ घेतात का? ते पाहावं लागेलं.
2019 सालच्या विधानसभा निवडणूकीत कल्याण ग्रामिण विधानसभेतून ऐनवेळी सुभाष भोईर यांना तिकीट नाकारले गेले. त्यांच्याऐवजी दुसऱ्या उमेदवाराला तिकीट दिल्या गेल्याने सेनेत दोन गट निर्माण झाले होते. त्यामुळे सुभाष भोईर यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे भोइर यांनी लावलेला बॅनर हा शुभेच्छा देण्यासाठी आहे, की काही राजकीय संकेत आहे? ते येणाऱ्या काळात पाहावे लागेल.