कल्याण - हिजाबच्या समर्थनात कल्याणमध्येकाँग्रेस महिला आघाडीकडून आज शिवाजी चौकातील आंदोलनास गालबोट लागले, हे आंदोलन हिजाबसाठी राजकारण करीत असल्याचा आरोप करत काही महिलांनी वाद घातला. यावेळी महिलांच्या दोन गटात झटापट झाली. हे आंदोलन उधळून लावण्यासाठी काही महिला पाठविण्यात आल्याचा आरोप काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांनी केला आहे.
कर्नाटकात हिजाबवरुन सुरु असलेल्या वादंग देशभरात पसरला आहे. अनेक ठिकाणी हिजाबच्या समर्थनात आंदोलन केले जात आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. या पाश्वभूमीवर काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांनी काँग्रेसच्या महिला आघाडीकडून हिजाबच्या समर्थनासाठी छत्रपती शिवाजी चौक परिसरात आंदोलनाचे आयोजन केले होते. या आंदोलनाकरीता काँग्रेस कार्यकर्ते जमले होते. आंदोलन सुरु झाले. त्याचवेळी गझल मांडेकर नावाच्या एका महिलेने काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांसोबत वाद घातला.
गझल मांडेकर यांचे म्हणण आहे की, हिजाब आमचा हक्क आहे. तो हिरावून घेऊन शकत नाही. मात्र, काँग्रेस राजकारण करीत आहे. त्यानंतर येथील काँग्रेस कार्यकर्त्या आणि गझल सोबत असलेल्या काही महिलांमध्ये जोरदार झटापट झाली. पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. काही महिलांचा विरेाध पाहता काँग्रेस कसेबसे हे आंदोलन उरकले. दरम्यान, याबाबत कांचन कुलकर्णी यांचे म्हणणे आहे की, आमचे आंदोलन शांत पद्धतीने सुरु होते. आमचे आंदोलन उधळून लावण्यासाठी महिला पाठविण्यात आल्या. या महिलांना कोणी पाठविले हे आम्हाला माहिती नाही. याची आम्ही पोलिसांकडे तक्रार करणार आहोत.