डोंबिवली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात आज डोंबिवलीतकाँग्रेसने केलेल्या आंदोलनादरम्यान काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आलेले पाहायला मिळाले. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संसदेमध्ये बोलताना काँग्रेस पक्षावर शाब्दिक हल्ला चढवला. त्याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे भाजपच्या कार्यालयाबाहेर निषेध आंदोलनाची हाक देण्यात आली. त्यानूसार आज कल्याण जिल्हा काँग्रेसतर्फे भाजपचे नेते आमदार रविंद्र चव्हाण यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनाची माहिती मिळताच भाजप पदाधिकारी आणि आमदार रविंद्र चव्हाण यांचे कार्यकर्ते काँग्रेस पदाधिकारी- कार्यकर्त्यांसमोर उभे ठाकले. आणि त्यांनी दुसऱ्या बाजूने वंदे मातरमच्या जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली. एकीकडे काँग्रेसकडून तर दुसरीकडे भाजपकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू झाल्याने काही काळ गोंधळाचं वातावरण तयार झाले होते.
मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वेळीच हस्तक्षेप करत काँग्रेस पदाधिकारी - कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. तर त्याचसोबत भाजपच्या पदाधिकारी- कार्यकर्त्यांचीही समजूत काढत वातावरण शांत केले.