महायुती सरकारविरोधात काँग्रेसचे चिखलफेक आंदोलन
By प्रशांत माने | Published: June 21, 2024 01:30 PM2024-06-21T13:30:09+5:302024-06-21T13:30:23+5:30
सरकारच्या प्रातिनिधिक पुतळ्यावर चिखलफेक करून केला निषेध
कल्याण: महापुरुषांचा अपमान, जाती धर्मात तेढ, पेपरफुटी आदी मुद्द्यांविरोधात राज्यभरात काँग्रेसतर्फे आज चिखलफेक आंदोलन छेडले जात आहे. कल्याणातही पक्षातर्फे चिखलफेक आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकार आणि केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पश्चिमेला कल्याण रेल्वे स्थानक जवळील तहसिल कार्यालयाच्या समोर जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले.
महापुरुषांचा सतत अपमान, जाती-धर्मात तेढ निर्माण करून सामाजिक स्वास्थ्य खराब करणे, गुन्हेगारीत वाढ, औद्योगिक विकासाला खिळ, पेपर फुटीचे ग्रहण, नीट चा गोंधळ घालून लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान, बेरोजगारी, शेतकऱ्यांची उपेक्षा, अशा एक ना अनेक कारणाने महाराष्ट्र अधोगतीला घेऊन जाण्याचं काम सध्याचे असंवेदनशील भाजपा पुरस्कृत सरकार करत असल्याची टीका जिल्हाध्यक्ष पोटे यांनी यावेळी केली.
यावेळी राज्य सरकारचा विरोध म्हणून काँग्रेस पक्षातर्फे महायुती सरकारच्या प्रातिनिधिक पुतळ्यावर चिखलफेक करून निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष पोटे, प्रदेश काँग्रेस सदस्य मुन्ना तिवारी, महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, ब्लॉक अध्यक्ष विमल ठक्कर, प्रवीण साळवे, माजी नगरसेवक नवीन सिंग, शकील खान यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.