डोंबिवली: येथील हम चॅरिटेबल ट्रस्टने मनोज नशिराबादकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा महिन्यापूर्वी जम्मू काश्मीर येथील सहा शाळांमध्ये विज्ञान प्रयोगशाळा उभ्या करण्याचा संकल्प केला होता. १८ मार्च रोजी त्या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होऊन तीन विद्यालयांमधील विज्ञान प्रयोगशाळांचे उद्घाटन झाल्याची माहिती बुधवारी संस्थेने दिली. उद्घाटन भारतीय विद्या मंदीर, अंबफला या शाळेतील बाळासाहेब देवरस सभागृहामधून प्रदीपकुमार, विद्याभरातीचे अखिल भारतीय सीएसआर आणि अभिलेख प्रमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
प्रयोगशाळेसाठी लागणारे थोडेसे बांधकाम, प्रयोग साहित्याची खरेदी आणि त्याची योग्य मांडणी व शिक्षकांना त्याचे प्रशिक्षण या सर्व गोष्टींची जबाबदारी हम चँरिटेबल ट्रस्टमार्फत घेण्यात आली होती. भारतीय शिक्षा समितीच्या अंबफला, दशमेशनगर, हिरानगर, भादरवा, राजौरी, उधमपूर या ठिकाणच्या शाळांमध्ये प्रयोगशाळा बांधण्याचे निश्चित करण्यात आले होते. ऑक्टोबर,२०२३ पासून यासाठी निधी संकलन व इतर गोष्टींची तयारी सुरू झाली. नेहमीप्रमाणेच दानशूर डोंबिवलीकर हमच्या पाठीशी उभे राहिले आणि एकेका प्रयोगशाळेसाठी लागणारा सुमारे ६ लाख एवढा निधी एकेका दात्यानी पूर्ण केला. त्यावेळी विजय नड्डा, विद्या भारतीचे संघटन मंत्री तसेच वेदभूषण शर्मा, भारतीय शिक्षा समितीचे अध्यक्ष प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने विद्यानिकेतन शाळेची राजेंद्र शिक्षण संस्था, ओमकार एज्युकेशन सोसायटी आणि टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या संस्थांचे मोलाचे योगदान लाभले.
अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने या निधीसंकलनाकरिता सहा वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आणि त्यातून दोन शाळांमधील वैज्ञानिक प्रयोगशाळांसाठी निधी संकलन केले. या कार्यक्रमांमुळेच हम ही संस्था व जम्मू काश्मीर येथील वैज्ञानिक प्रयोगशाळांसाठीचे निधी संकलन हा विषय अनेकांपर्यंत पोचण्यास मदत झाली. टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामार्फत माधव जोशी, चंद्रशेखर टिळक,. संदीप घरत, पोंक्षे कुटुंबिय आणि दोन कंपन्यांच्या सीएसआर फंडमधून निधी संकलन पूर्ण करण्यात आले. निधी संकलनाबरोबरच महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रयोगशाळेतील उपकरणे व साहित्य जम्मुपर्यंत पोचवणे, प्रयोगशाळेची मांडणी करणे हे होते. मनोज नशिराबादकर यांच्या बरोबरीने या मध्ये मोलाचे सहकार्य दिले ते डोंबिवलीतील राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सचिव संजय कुलकर्णी यांनी. गेल्या काही महिन्यात दोन वेळा स्वखर्चाने तिथे जाऊन दहा दहा दिवस राहून, या विषयातील आपल्या अनुभवातून प्रयोगशाळा उभ्या केल्या. तेथील शिक्षकांना त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण दिले.
हे तंत्रज्ञान डडवारा येथील भारतीय शिक्षा समितीच्या शाळेत शिकणाऱ्या आशिष सपोलिया आणि अच्युत महाजन या विद्यार्थ्यांनी त्याठिकाणी राबविले. जम्मू काश्मीर बदलत आहे याचाच हा दाखला आहे आणि म्हणूनच प्रकल्पूर्तीचा आनंद चारही संस्थाना खूपच आहे असे हम संस्थेचे अध्यक्ष सुनिल देशपांडे म्हणाले.