डोंबिवली : महापालिकेच्या डोंबिवली पूर्व भागातील दत्तनगर चौकात सरकारी आरक्षित जागेवर सुरू असलेले अनधिकृत बांधकाम २२ तासाच्या अखंड कारवाईअंती शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास अखेर जमिनदोस्त करण्यात आले. या दरम्यान अडथळा निर्माण करणाऱ्या विकासकासह त्याच्या साथीदारांवर महापालिकेने पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.हे बांधकाम अनधिकृत घोषित केल्याने ते सात दिवसांत स्वखर्चाने काढून घेणेबाबत यापूर्वीच बांधकामधारक प्रफुल्ल गोरे यास नोटीस बजावली होती, परंतु, त्यांनी ते न पाडल्यामुळे गुरुवारी विभागीय उपायुक्त पल्लवी भागवत, सहा. आयुक्त (अनधिकृत बांधकाम) सुहास गुप्ते, क प्रभाग क्षेत्र अधिकारी अक्षय गुडधे, फ प्रभाग क्षेत्र अधिकारी भरत पाटील, ई प्रभाग क्षेत्र अधिकारी भारत पवार, ड प्रभाग क्षेत्र अधिकारी सुधीर मोकल आणि ग प्रभाग क्षेत्र अधिकारी संदीप रोकडे यांच्या समक्ष उपस्थितीत ही निष्कासनाची कारवाई सुरू केली होती. ती सुरू असतानाच अनधिकृत बांधकाम धारक प्रफुल्ल गोरे व त्यांच्या समवेत असलेल्या जमावाने कारवाईस विरोध करून कारवाईसाठी आणलेल्या ३ ब्रेकर,जेसीबी मधली हवा काढून टाकली. पोकलेन यंत्र कारवाईच्या ठिकाणी पोहोचण्यामध्ये घरडा सर्कल येथे गुंड पाठवून अडथळा करण्याचा प्रयत्न केला. महापालिकेच्या कारवाईस अडथळा निर्माण केल्यामुळे ग प्रभाग क्षेत्र अधिकारी संदीप रोकडे यांनी बांधकामधारक प्रफुल्ल गोरे व अन्य काही जणांवर रामनगर पोलीस ठाण्यात मध्यरात्री गुन्हा दाखल केल्याची माहिती महापालिकेने पत्रकाद्वारे दिली.महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी एखादी मिळकत खरेदी करतांना महापालिकेकडून सदर मिळकतीबाबत खातरजमा करूनच ती खरेदी करून होणारे संभाव्य नुकसान टाळावे, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन केडीएमसीने केले आहे.
दत्तनगर चौकामधील ‘ते’ बांधकाम 22 तासांत तोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 12:30 AM