मुरलीधर भवार,कल्याण:कल्याणडोंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्या गाडीचा पाठलाग करणारा कंत्राटी कामगार धर्मेंद्र सोनावणे याला कामावरुन कमी करण्यात आले आहे.
महापालिका आयुक्त जाखड या आंबिवली टिटवाळा परिसरात पाहणी दौरा करण्यासाठी निघाल्या असता त्यांच्या गाडीचा पाठलाग दुचाकीवरुन कोणीतरी करीत असल्याचे आयुक्तांच्या लक्षात आले. आयुक्तांनी त्यांच्या गाडी चालकास गाडी बाजूला घेण्यास सांगितले.
पाठलाग करीत असलेल्या दुचाकी चालकाची चौकशी केली. चौकशी पश्चात दुचाकीवरुन पाठलाग करणाऱ््या व्यक्तिच्या गळ्यात केडीएमसीचे आेळखपत्र आढळून आले. त्याची भांबेरी उडाली. तो महापालिकेचा कंत्राटी कामगार आहे. कंत्राटी वाहन चालक म्हणून काम करतो. त्याचे नाव धर्मेंद्र सोनावणे असे आहे.
आयुक्तांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त अर्चना दिवे यांना दिले होते. उपायुक्त दिवे यांनी कामगार सोनावणे याच्याकडून खुलासा मागितला होता. सोनावणे दिलेला खुलासा आणि प्रत्यक्षात घडलेली घटना यामध्ये तफावत आढळून आली. त्यामुळे प्रशासनाने सोनावणे याचा खुलासा मान्य केला आहे. उपायुक्त दिवे यांनी सोनावणे याला कामावरुन कमी केले आहे. या घटनेमुळे आयुक्तांच्या सुरक्षा व्यवस्थेत कोणताही धोका उद्भवलेला नाही. मात्र महापालिकेच्या कामगारांनी त्यांच्या कार्यालयीन वेळेत त्याना दिलेली कामे जबाबदारी पूर्व पार पाडली पाहिजेत अशा सूचना कामगारांना सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने देण्यात आलेल्याआहेत.