कल्याण-कल्याण डाेंबिवली महापालिका हद्दीत नालेसफाईच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. येत्या आठवडाभरात नालेसफाईचे काम पूर्ण केले जाणार आहे. मात्र नालेसफाईच्या कामात निष्काळजीपणा केल्यास ठेकेदाराला कामाचे बिल दिले जाणार नाही. तसेच त्याला काळया यादीत टाकले जाईल असा इशारा महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिला आहे.
नालेसफाईच्या कामाची पाहणी आयुक्त दांगडे यांनी केली. या प्रसंगी सचिव संजय जाधव यांच्यासह जल मल निस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगूळ आदी अधिकारी उपस्थित होते. महापालिका हद्दीत ९२ मोठे नाले आहेत. या मोठया नाल्यांच्या सफाईकरीता ३ कोटी ७० लाख रुपये खर्चाची निविदा काढली आहे. खाजगी कंत्राटदारांना नालेसफाईचे काम दिले आहे. त्याचबरोबर लहान गटारे स्वच्छ करण्याकरीता २ कोटी ५० लाख रुपये खर्च केला जाणार आहे. नालेसफाईच्या कामाची पाहणी आज आयुक्तांनी केली.
आज कल्याण परिसरातील नालेसफाईच्या कामाची पाहणी करुन किती काम झाले आहे याचा आढावा घेतला. तसेच डोंबिवलीतील नाल्याचीही सफाई कामाची पाहणी केली जाणार आहे. नालसफाई मध्ये हात सफाई केली जात असल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. या विषयी आयुक्तांकडे विचारणा केली असता व्हीडीआेची सत्यता तपासली जाईल. त्यात तथ्य असल्यास संबंधित ठेकेदाराच्या विरोधात कारवाई केली जाईल असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.