शहराच्या पश्चिमेला असलेल्या दिनदयाळ रोडवरील शिवसेना शाखेत वाद झाल्याची घटना काल घडली आहे. शहर प्रमुख विवेक खामकर यांनी पैसे आणि कागदपत्रे चोरल्याच्या आरोपावरुन विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी खामकरसह अन्य एकाला अटक केली आहे. या दोघांना पोलिसांनी कल्याण न्यायालयात हजर केले असता दोघांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
शिंदे गट आणि शिवसेना पक्षात वाद आहे. दोन्ही गटांकडून शिवसेनेवर दावा केला जात आहे. दीनदयाळ रोडवरील शिवसेना शाखेत शाखा प्रमुख र्पेश म्हात्रे आणि पवन म्हात्रे हे दोघे बसलेले असताना त्याठीकाणी शहर प्रमुख खामकर पोहचले. त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक ही होते. खामकर यांनी परेश याला विचारणा केली की, तुम्ही कोणत्या गटात आहात. त्यावेळी परेश यांनी आम्ही शिवसेनेत आहोत. आम्ही कोणत्याही गटात गेलेलो नाही. त्यानंतर खामकर शाखेबाहेर आले. त्यांनी शाखेबाहेर एक बॅनर पाहिला. त्या बॅनवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचेही फोटो होते. हा पाहून खामकर यांनी तो बॅनर फाडला. त्यांना म्हात्रे यांनी मज्जाव केला असता त्यांच्या झटापट झाली. शाखेतील टेबलवर ठेवलेले महत्वाचे कागदपत्र आणि १५ हजाराची असलेली पिशवी गायब झाली. म्हात्रे यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शहर प्रमुख खामकर सह श्याम चौगुले यांच्या विरोधात पैसे चोरल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.
शिंदे यांच्या राजकीय बंडानंतर डोंबिवलीचे शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांनी शिंदे यांना पाठींबा देत त्यांच्या गटात सामिल झाले. त्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी डोंबिवली शहर प्रमुख पदी खामकर यांची नियुक्ती केली होती. शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील वादातून खामकर यांच्यावर पैसे चोरी आणि बॅनर फाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिस तपासा अंतीच या आरोपात किती तथ्य आहे हे स्पष्ट होणार आहे.