कल्याण : आगरी युथ फोरमतर्फे दरवर्षी डिसेंबरमध्ये डोंबिवलीतील क्रीडासंकुलात आगरी महोत्सव भरवण्यात येतो. मात्र, यंदा कोरोनाचे संकट पाहता हा महोत्सव रद्द केल्याची माहिती आगरी महोत्सवचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी दिली आहे. आगरी युथ फोरमच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला वझे, जालिंदर पाटील, विजय पाटील, रामकृष्ण पाटील, पांडुरंग म्हात्रे, शरद पाटील, संतोष संते आदी पदाधिकारी उपस्थित होते.
गेली १७ वर्षे हा आगरी महोत्सव होत आहे. त्यात संस्कृती, परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि गृहपयोगी वस्तूंची मोठी बाजारपेठ असते. मात्र, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. नागरिकांचे जीवन मूल्य हे सगळ्य़ात श्रेष्ठ असून, ते जपण्यासाठी सगळ्य़ांनी सोशल डिस्टन्सिंग पाळले आहे. आगरी महोत्सवास कल्याण-डोंबिवली पंचक्रोशीतील अनेक ज्ञाती समाजाचे लोक भेट देतात. त्यामुळे महोत्सवाला गर्दी होते. ती टाळण्यासाठी यंदा महोत्सव रद्द केला आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविली जात असताना ‘माझा समाज, माझी जबाबदारी’ या उद्देशाने जबाबदारीपूर्वक हा महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे वझे यांनी सांगितले. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी कोराेनाची साथ संपलेली नाही. तसेच बाजारात कोरोनाची लसही आलेली नाही. त्यामुळे गर्दी नकोच या हेतूने हा महोत्सव होणार नसल्याचे फोरमकडून सांगण्यात आले.