डोंबिवली : केडीएमसीची कोविड केंद्रे असुरक्षित असल्याचे पुन्हा उघडकीस आले आहे. पूर्वेतील जिमखाना कोविड केंद्रातील एका महिला रुग्णाच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अनोळखी व्यक्तीने लांबविल्याची घटना १ डिसेंबरच्या मध्यरात्री घडली. या प्रकरणी सोमवारी टिळकनगर पोलीस ठाण्यात महिलेच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.१ डिसेंबरला रात्री १० वाजता रुग्ण महिलेस रेमडेसीवीर इंजेक्शन दिले. त्यामुळे त्यांना गाढ झोप लागली. २ डिसेंबरला सकाळी ९ वाजता त्यांना जाग आल्यावर गळ्यात सोन्याचे मंगळसूत्र नसल्याचे लक्षात आले. या चोरीप्रकरणी रुग्णालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, रुग्णाचे दागिने लंपास झाल्याची सहा महिन्यांतील ही तिसरी घटना आहे.जुलैमध्ये केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात मृत्यू झालेल्या ५५ वर्षीय कोरोना रुग्णाची दीड तोळ्याची चेन चोरीला गेली होती. याबाबतची तक्रार नातेवाइकांनी रुग्णालय प्रशासन, तसेच माजी महापौर व नगरसेवक रमेश जाधव यांच्याकडेही केली होती, तर ऑक्टोबरमध्येही गोविंदवाडी परिसरातील आसरा कोविड उपचार केंद्रात ६५ वर्षीय कोरोनाबाधित वृद्धेचे सोन्याचे दागिने व रोकड, असा ९७ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. या प्रकरणी त्या महिलेच्या मुलाने बाजारपेठ पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला होता, तर आता तिसरी चोरीची घटना घडल्याने कोविड केंद्रांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, या संदर्भात केडीएमसीच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी पाटील यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
कोरोना रुग्णाचे मंगळसूत्र चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 12:44 AM