कल्याण - कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. आता हळुहळु सर काही पूर्वपदावर येत आहे. महाविद्यालयांना देखील वर्ग घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र दोन लस घेण्या-या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश करण्यास परवानगी असल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयातच लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी जोर धरु लागली होती. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आता महाविद्यालयात जाऊन लसीकरण मोहीम राबवण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असून या निर्णयाच महाविद्यालय प्रशासनानं स्वागत केलं आहे.
सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण, महाराष्ट्र राज्य यांनी निर्देशित केल्यानुसार " युवा स्वास्थ कोविड-19 चे लसीकरण मोहिमेचे नियोजन " कल्याण डोंबिवली महानगरपालिके मार्फतही करण्यात येत असून आता महापालिका क्षेत्रातील 18 वर्षावरील महाविदयालयीन विदयार्थी/ विदयार्थींनी,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचेच लसीकरण आता प्रत्यक्ष महाविदयालयात जावून केले जाणार आहे. यासाठी महापालिका क्षेत्रातील महाविदयालयातून तेथील विदयार्थी व इतर कर्मचारी वर्गाची यादी प्राप्त करुन त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य पथकामार्फत त्यांचे लसीकरण दि. 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत केले जाणार असल्याचं महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.