कल्याण- गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवली शहरातील लसीकरण केंद्र वारंवार बंद ठेवावी लागत आहेत. एकीकडे राज्य सरकारने 15 ऑगस्टपासून दोन लस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी केडीएमसीच्या कल्याणातील आचार्य अत्रे रंगमंदिर लसीकरण केंद्रावर आज तोबा गर्दी उसळलेली पाहायला मिळाली. विशेष बाब म्हणजे जवळच केडीएमसीचे मुख्यालय असून सुद्धा कोणी अधिकारी या ठिकाणी फिरकले नाही. (Citizens angry over vaccine depletion, allegations of coupon black market)
केडीएमसी प्रशासनाकडून किंवा ज्या खासगी एजन्सीला लसीकरणाचे कंत्राट देण्यात आले आहे त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे नियोजन गेले नसल्याने काही नागरिक केडीएमसी मुख्यालयावर धडकले होते. बुधवारी नागरीकांच्या सहनशीलतेचा अंत झालेला पाहायला मिळाला. एकीकडे खाजगी वाहन परवडत नसल्यानं लोकल प्रवासासाठी नागरीकांची धडपड तर दुसरीकडे लसींचा दुसरा डोस मिळवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष या गोष्टीमुळे कल्याण डोंबिवलीतील नागरिक अक्षरशः हतबल झालेले पाहायला मिळाले. यावेळी कुपनचा काळा बाजार होत असल्याचा आरोपही करण्यात आला.
काल रात्रीपासून आचार्य अत्रे रंग मंदिराबाहेर नागरीक रांगेत उभे होते. जवळपास दोन किलोमीटर पर्यंत ही रांग पोहचली होती. पहाटे 3 वाजल्यापासून रांगेत उभे राहूनही लसीचे टोकन न मिळाल्याने नागरिक चांगलेच संतापले होते. सोनाली पाठारे या तरुणीने लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलेले पाहायला मिळाले. तसेच कुपन वाटण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेत एवढ्या लवकर कुपन कसे काय संपले असा संतप्त सवाल उपस्थित केला. नागरीकांचा संताप पाहता पोलिसांना घटनास्थळी दाखल व्हावं लागले. " वरातीमागून घोडे" या उक्तीनुसार गर्दी ओसरल्यावर व गोंधळ शांत झाल्यावर पालिकेच्या उपायुक्त पल्लवी भागवत यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी आमच्याकडून नागरिकांना योग्य त्या सूचना दिल्याचे आणि कुपन व्यवस्थितपणे वाटले गेल्याचा दावा करण्यात आला.
राज्य सरकारने लोकल प्रवासाबाबत महत्वपूर्ण घोषणा केल्यानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये लसीसाठी गर्दी उसळणार ही बाब स्पष्ट होती. मात्र, कोणतंही नियोजन प्रशासनाकडून केलं गेलं नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे यापूढे तरी प्रशासन यातून काही धडा घेणार का? हा देखील एक प्रश्नच आहे. आपल्याला काही वेळापूर्वीच या गोंधळाची माहिती समजली. एकंदर परिस्थिती पाहता यापूढे आता केडीएमसीचा एक अधिकारी नियुक्त केला जाईल. तसेच नागरिकांना सूचना देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल - उपायुक्त डॉ. पल्लवी भागवत