कल्याण : कल्याण- डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची बदली झाली आहे. मात्र, त्यांची महापालिका आयुक्तपदाची कोरोना काळातील कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. याबद्दल त्यांना गौरविण्यात आले असून, नागरिकांकडूनही त्यांना कौतुकाची थाप मिळाली आहे. दरम्यान, बदलीनंतर आयुक्त सूर्यवंशी यांनी केलेल्या कामाविषयी समाधानी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आयुक्त सूर्यवंशी यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये पदभार स्वीकारला. त्यांनी स्कायवॉक, आधारवाडी डम्पिंगची पाहणी केली. त्यांनी कामाला सुरुवात केली. तोच मार्च महिन्यात कोरोनाचे जागतिक संकट आले. या संकटाला सामना देण्यासाठी पुरेशी आरोग्य यंत्रणा उपलब्ध नसताना त्यांनी तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने जंबो कोविड रुग्णालये उभारली. कोरोना काळात मेडिकल स्टाफची भरती केली. रुग्णवाहिका हायर केल्या. ऑक्सिजन प्लांट उभारले. कोरोना लॅब सुरू केली. फॅमिली डॉक्टर ही संकल्पना राबविली. खासगी डॉक्टर्सच्या मदतीने उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारे कोरोनाशी सामना केला. त्यातूनच डॉक्टर आर्मी ही संकल्पना पुढे आली. त्यांच्या या कामाची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना इन्व्होशन अवॉर्ड देऊन गौरवले.
आयुक्तांनी राबविलेल्या ‘माय सिटी, फिट सिटी’ या संकल्पनेसाठीही त्यांचा देशपातळीवर गौरव झाला. शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्राकडून त्यांनी निधी मिळविला. आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचे उद्दिष्ट ठेवले. शून्य कचरा मोहीम राबवून कचरा प्रकल्पासाठी बायो मायनिंगचा १३७ कोटींचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला. प्रशासक म्हणून महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करताना अनावश्यक खर्चाला काटकसर लावली. आवश्यक कामांना प्राधान्य दिले. त्याचबरोबर शहरातील बेकायदा बांधकामे पाडण्याचा सपाटा लावला. धोकादायक इमारतीही पाडून त्यामधील रहिवासींना हमी देणारे प्रमाणपत्र दिले.कल्याण-डोंबिवलीतील ‘हॅप्पी स्ट्रीट’ आता मुंबईत
उल्हास नदी आणि खाडीपात्रात मिळणारे जवळपास २८ नाले वळविण्याचे काम आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हाती घेतले. काही रस्ते नागरिकांसाठी आरक्षित करीत हॅप्पी स्ट्रीटचे उपक्रम राबविले. त्याचे अनुकरण आता मुंबईत केले जात आहे. दुर्गाडी येथे नौदल संग्रहालय उभारण्यासाठी पुढाकार घेतला. नौसेनेकडून एक शिप या स्मारकासाठी दिले जाणार आहे. मोकळे आरक्षित भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली ते खेळाडू संस्थांना देण्यासाठी पुढाकार घेतला. कल्याण- डोंबिवली स्पोर्ट सिटी करण्यासाठी महापालिका अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद ठेवली.