कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना होम क्वारंटाइन केलेले बरेच जण मोकाट फिरताना दिसत आहेत. यामुळे त्यांना वेसण घालून कोरोनास रोखण्यासाठी होम क्वारंटाइन असलेल्यांची यादी पोलीस ठाण्यात देण्याबरोबरच त्यांच्या घरावर होम क्वारंटाइनचे स्टिकर्सही लावले जाणार आहे. यामुळे होम क्वारंटाइन असलेली व्यक्ती मोकाट फिरताना दिसल्यास त्याविरोधात पोलिसांना कारवाई करणे सोपे जाईल, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली. होम क्वारंटाइन केलेले अनेक जण मोकाट फिरताना दिसतात, असे सांगून त्यांच्याविरोधात पोलिसांकरवी कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी म्हटले होते. मात्र, आता त्याचे पुढचे पाऊल म्हणजे होम क्वारंटाइन असलेल्यांची यादीच पोलिसांच्या हाती दिली जाणार आहे. सध्या महापालिकेने १४ दिवसांकरिता एक लाख ८३ हजार ८८५ जणांना होम क्वारंटाइन केले आहे. मार्च २०२० पासून आतापर्यंत एकूण १५ लाख १० हजार २२३ जणांना होम क्वारंटाइन केले असून यापैकी १३ लाख ३२६ जण क्वारंटाइनमुक्त झालेले आहेत. रोज ७०० जणांची चाचणीकल्याण रेल्वेस्थानकात बाहेरगावाहून येणा-या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात आहे. २४ तास त्याठिकाणी चाचणी पथक तैनात आहे. रोज किमान ७०० प्रवाशांची चाचणी केली जात आहे. त्याठिकाणी लॅब टेक्निशियन असतो. मात्र, कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाला रुग्णवाहिका नेण्यास आली नाही, म्हणून एका रुग्णाने पलायन केले होते. हा प्रकार टाळण्यासाठी महापालिकेने त्याठिकाणी रुग्णवाहिका तैनात केली आहे. याठिकाणी पोलीस बंदोबस्त नसतो. पॉझिटिव्ह आलेले काही रुग्ण हे भिवंडीचे होते, असे डॉ. पानपाटील यांनी सांगितले. महापालिका हद्दीत आता कोरोना डबलिंगचा रेट ६० दिवसांचा आहे. रुग्णांच्या मृत्यूचा दर १.५७ टक्के आहे. गेल्या १५ दिवसांत कोरोनामुळे ३१ जणांचा मृत्यू झालेला आहे. तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.३८ टक्के इतके आहे.
coronavirus: होम क्वारंटाइन रहिवाशांवर आता पोलीस ठेवणार नजर, केडीएमसीची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 3:16 AM