कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत लसीकरण मोहिमेचा सावळा गोंधळ वारंवार समोर येत आहे. टप्प्याटप्प्याने लस प्राप्त होत असल्याने लसीकरण केंद्रही बंद ठेवावी लागत आहे. अशातच लसीकरण केंद्र आणि केडीएमसी प्रशासन यांच्यात देखील योग्य समन्वय नसल्याने नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कल्याणातील गुरूनानक लसीकरण केंद्रावरही गुरुवारी सकाळी अचानक नागरिकांना लस प्राप्त न झाल्याचे सांगत पुन्हा जाण्यास सांगितले. यामुळे पहाटेपासून लसीकरणासाठी उभ्या असलेल्या नागरिकांचा संताप अनावर झाला. आता लसीकरण करणे म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर अशी स्थिती कल्याण डोंबिवलीकरांची झाली असल्याचे सांगत नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला आहे.
गुरुवारी कल्याणातील गुरुनानक हायस्कूल लसीकरण केंद्रावर कुपन घेण्यासाठी पहाटे 3 वाजल्यापासून जवळपास 300 नागरिक उभे होते. मात्र सकळी साडेसात वाजता अचानक लस उपलब्ध झाली नसल्याने लसीकरण होणार नाही असे सांगण्यात आले. या गलथान कारभारावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लसीकरण होणार नाही याची महिती आदल्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी देणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया केंद्रावर उपस्थित असलेल्या संबंधीतांसमोर व्यक्त केल्या. यावर आम्हाला महापालिका प्रशासनाने सकाळी लस संपल्याची माहिती दिली असे सांगण्यात आले. या सर्व प्रकारामुळे केडीएमसी प्रशासन आणि लसीकरण केंद्र नागरिकांसोबत उंदीर - मांजराचा खेळ खेळत आहेत का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वात जास्त फटका बसला. केडीएमसीचे आरोग्य विभागाचे आर. सी. एच. ऑफीसर डॉ. संदीप निंबाळकर यांना विचारले असता लशींचा साठा अनेकदा रात्री उशीरा किंवा सकाळी प्राप्त होतो. लसीकरणाची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे वेळोवेळी दिली जाते व तसे बोर्ड देखील केंद्राबाहेर लावले जातात असे सांगत प्रशासनाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.
लसीकरण करणे हे महत्वाचे झाले आहे. लसींचा साठा कमी असल्याने अडचणी येत आहे हे मान्य आहे. मात्र लसीकरण केंद्र व पालिका प्रशासन यांच्यात योग्य तो समन्वय असणे गरजेचे आहे. कारण अनेक नागरिक सुट्टी घेऊन लसीकरण करत आहे. लस घेण्यासाठी आता खूप मनस्ताप सहन करावा लागत असल्याने रोगापेक्षा इलाज भयंकर असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
- प्रतीक्षा वाराणकर, नागरिक