कल्याण - कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत कोरोनाने कहर केला असून रोज 4 ते 5 व्यक्ती मृत्युमुखी पडत आहे. कल्याणमधील डॉक्टर असलेल्या मिश्रा पिता -पुत्राचाही कोरोनाने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनाच्या कठीण काळात आपले रुग्णालय बंद न ठेवता सुरुवातीपासूनच या दोघांनीही सामाजिक भान जपत रूग्णांना सेवा दिली होती. विशेष म्हणजे केडीएमसी हद्दीत व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना अन्य शहरात बेडसाठी वणवण फिरावे लागत आहे. रूग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टरांवरच अशी वेळ येत असेल तर तिथे गरीब रूग्णांची काय अवस्था असेल? याची कल्पना न केलेलीच बरी.
नागेंद्र मिश्रा ( 58) आणि सूरज मिश्रा ( 28) अशी मृत्युमुखी पडलेल्या पिता-पुत्राची नावे आहेत. कल्याणपश्चिमेकडील गांधारी परिसरात मिश्रा कुटुंब राहतात. टिटवाळा नजीक असलेल्या खडवली परिसरात नागेंद्र यांचे क्लिनिक होते तर भिवंडी नजीक बापगाव परिसरात सूरज यांचे क्लिनिक होते. मिश्रा कुटुंबातील सर्व सदस्य कोरोनाबाधित असून वेगवेगळ्या महापालिका हद्दीत उपचार घेत आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये व्हेंटिलेटर बेड शिल्लक नसल्याने नागेंद्र यांच्यावर ठाण्यातही तर सुरज यांच्यावर गोरेगावातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. नागेंद्र यांच्या पत्नीवर वसई विरार येथे उपचार सुरू आहे. दरम्यान ही घटना दुःखद असून हे दोन्ही मृत्यू केडीएमसी हद्दीबाहेर झाल्याने याबाबत अद्याप कल्पना नाही परंतु लवकरच याबद्दल माहिती प्राप्त होईल असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
वाढदिवसाच्या दिवशीच मृत्यूच्या कवेत
शुक्रवारी नागेंद्र यांचा वाढदिवस होता. मात्र याच दिवशी त्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. तर नोव्हेंबर 2020 मध्ये सूरज याचे लग्न झाले होते आणि लागलीच त्याचाही कोरोनाने घात केला. सामाजिक भान जपत रूग्णांना सेवा देणाऱ्या मिश्रा पिता पुत्रांच्या अचानक जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे. गेल्या लाटेतही कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत चार डॉक्टरांना आपला जीव गमवावा लागला होता. मात्र आता शहरात विशेषतः व्हेंटिलेटर बेडसाठी काही हालचाल केली जाते की येणाऱ्या काळातही बेडसाठी नागरीकांना वणवण फिरावे लागत ते पाहावे लागेल.