राज्यात सर्वत्रच रेमडेसिवीर (Remdesivir) इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. कल्याण डोंबिवलीतील खासगी रुग्णालयांमधून देखील रेमडेसिवीरचे प्रिस्क्रिप्शन नातेवाईकांना लिहून दिल जातं आहे. मात्र आता केडीएमसीच्या कोविड सेंटर मधून देखील रुग्णांच्या नातेवाईकांच्या हातात रेमडेसिवीर बाहेरून आणण्यासाठी प्रिस्क्रिप्शन लिहून दिले जात असल्याने रुग्णाच्या नातेवाईकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मात्र पालिकेच्या रुग्णालयात नियमित इंजेक्शन उपलब्ध करून दिली जात असतानाही या रुग्णालयातून प्रिस्क्रिप्शन देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होतंय.
राज्य शासनाने रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार रोखण्यासाठी सरकारी पातळीवरून थेट रुग्णालययाना इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचे आदेश दिलेत. मात्र प्रत्यक्षात मागणीच्या 30 टक्के देखील इंजेक्शन देखील उपलब्ध होत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. दुसरीकडे पालिकेच्या कोरोना सेंटरमध्ये पालिकेच्या आरोग्य विभागाकडून हे इंजेक्शन उपलब्ध करून दिले जात असल्याने पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांना काहीसा दिलासा मिळत होता. मात्र आता पालिका रुग्णालयांना देखील इंजेक्शनचा तुटवडा जाणवू लागल्याचं चित्र आहे. केडीएमसीच्या सावळाराम म्हात्रे कोरोना केअर सेंटरमधून रुग्णाच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शन बाहेरून विकत आणण्यासाठी चिठ्ठी लिहून दिल्याने रुग्णाचे नातेवाईकांकडून हे इंजेक्शन मिळविण्यासाठीची धावपळ सुरू झाली आहे.