कल्याण - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक कुटुंब मोठ्या प्रमाणावर बाधित होत आहेत. पहिल्या लाटेपेक्षा या लाटेत कोरोनाचा वेगाने प्रसार होत असल्याने संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब यामध्ये कोविड पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. अशा कुटुंबांची मोठी गैरसोय होत असल्याने कल्याणमधील दोन तरुण अशा नागरिकांसाठी पूढे सरसावले आहेत. मोफत पाणी देणे, औषध व जेवण पूरवणे इत्यादी सोयीसुविधा उपलब्ध करून कल्याणातील दोन तरुण सामाजिक भान राखताना दिसत आहेत.
कोरोनाच्या कठीण काळात अनेक ठिकाणी रक्ताच्या नात्यांपेक्षा अनोळखी नात्यांमधून माणूसकीचे दर्शन घडले आहे. एकमेकांवर टीका करण्यापेक्षा प्रत्यक्षात लोकांना मदत करण्यात महेश बनकर आणि विकी मोरे या दोन तरूणांनी प्राधान्य दिले आहे. काहीजण होम आयसोलेशनचा पर्याय निवडत आहेत. अशावेळी या कुटुंबांच्या मदतीसाठी कोणी असेल तर ठीक. अन्यथा अशा होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांची परवड सुरूच राहते. अशा असहाय्य रुग्णांच्या मदतीसाठी विकी मोरे या तरुणाने पुढाकार घेतला आहे. अशा रुग्णांसाठी विकी जेवणाचे डबे, औषधे आणून देण्याचे काम करतो. डोंबिवली, ठाणे, भाईंदर, नवी मुंबई आदी ठिकाणी विकीने कोविड कुटुंबियांची मदत केली आहे. विकी हा व्यवसायाने विमा सल्लागार आहे.
एकीकडे असह्य असा उकाडा आणि दुसरीकडे रुग्णालयात दाखल आपल्या कुटुंब सदस्याची चिंता. या दोन्हीवर व्यवसायाने शेफ असलेला महेश बनकर प्रेमाची आणि मायेची फुंकर घालण्याचा प्रयत्न आपल्या कामातून करत आहे. लाल चौकी येथे असलेल्या कोविड रुग्णालयाच्या बाहेर रुग्णाच्या नातेवाईकांना पाणी देण्यासह त्यांची विचारपूस करणे, धीर देणे, प्रेमाचे दोन शब्द बोलणे अशा सध्या दुरापास्त झालेल्या गोष्टी महेश आपल्या या जलदानाच्या कामातून करत आहे. तसेच डिस्चार्ज झालेल्या रूग्णांच्या सकारात्मक प्रतिक्रिया घेऊन इतर नागरिकांना धीर देण्याचे महत्वाचे काम देखील महेश करतोय. समाजात कमी होत जाणारी माणुसकी या दोघांसारख्या अनेक व्यक्तींमुळे आजही जिवंत असल्याचेच दिसून येत आहेत.